छोटा राजन टाळाताल गुंड संतोष सावंतला अटक, सीबीआयची कारवाई, सिंगापूरहून मुंबई विमानतळावर उतरताच घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 13:21 IST2023-04-20T13:20:55+5:302023-04-20T13:21:15+5:30
Santosh Sawant arrested : खंडणीसह विविध गुन्हे दाखल असलेल्या आणि गेल्या दोन दशकांपासून फरार असलेला छोटा राजन टोळीचा गुंड संतोष सावंत, याला सीबीआयने मंगळवारी मुंबई विमानतळावर अटक केली.

छोटा राजन टाळाताल गुंड संतोष सावंतला अटक, सीबीआयची कारवाई, सिंगापूरहून मुंबई विमानतळावर उतरताच घेतले ताब्यात
मुंबई : खंडणीसह विविध गुन्हे दाखल असलेल्या आणि गेल्या दोन दशकांपासून फरार असलेला छोटा राजन टोळीचा गुंड संतोष सावंत, याला सीबीआयने मंगळवारी मुंबई विमानतळावर अटक केली. छोटा राजन याचे आर्थिक व्यवहार प्रामुख्याने तो हाताळायचा. त्यामुळे छोटा राजनसाठी हा मोठा धक्का आहे.
संतोष सावंत हा सिंगापूर येथे हॉटेल व्यवसायात सक्रिय होता. तेथून तो मोठ्या प्रमाणावर टोळीचे आर्थिक व्यवहार सांभाळत होता. त्याच्या प्रत्यार्पणासाठी सरकारने सिंगापूर सरकारसोबत बोलणी सुरू केली होती. त्यानंतर सिंगापूर येथून हकालपट्टी होण्याची कुणकुण लागल्यानंतर त्याने त्याच्या वकिलामार्फत मुंबईतील सक्षम न्यायालयामध्ये शरणागती पत्करण्याची तयारी सुरू केली होती. त्यासाठी मंगळवारी रात्री तो सिंगापूर
येथून मुंबईत दाखल झाला विमानतळावर उतरल्यावर इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत त्याला सीबीआयकडे सुपूर्द केले. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता २ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याच्या विरोधात मकोकासह सहा गुन्हे नोंद आहेत. यात २००५ मध्ये त्याने मुंबईतील टिळकनगर येथील एका बिल्डरकडून २० लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल संगण्यात आला होता. तर त्याच्या विरोधात असलेल्या मकोका केसमध्ये छोटा राजन याची पत्नीही सहआरोपी आहे. त्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर २०१२ मध्ये त्याच्याविरोधात इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. त्याचे प्रकरण २०१६ मध्ये सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. छोटा राजनविरोधातील ७१ प्रकरणे सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहेत.
कोण आहे सावंत?
एका मालमत्तेच्या व्यवहाराच्या निमित्ताने संतोष सावंत याची छोटाराजनशी ओळख झाली होती. त्यानंतर तो राजन याच्या नियमित संपर्कात होता. राजन याचाही त्याच्यावर प्रचंड विश्वास बसला. मुंबईत सुरु असलेले बिल्डरांचे प्रकल्प राजनच्या निदर्शनास आणणे आणि त्यांच्याकडून खंडणी 'उकळण्याचे प्रकार त्याने मोठ्या प्रमाणावर सुरू केले.