मुंबई : माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ४० मिनिटे चर्चा केली. मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यापासून ते त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार यांना मात्र भेटलेले नाहीत.
भुजबळ यांच्यासोबत समीर भुजबळ हेदेखील होते. तीव्र नाराज असलेले भुजबळ यांनी ‘कसला दादा अन् कसला वादा’ असे टीकास्त्र सोडत अजित पवार यांना लक्ष्य केले होते. ‘जहाँ नही चैना, वहाँ नही रहना’ असे म्हणत अजित पवार गट सोडण्याचे संकेतदेखील दिले होते. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे. काही समर्थकांनीदेखील ‘भाजपसोबत चला’ असे विनंतीवजा आवाहन त्यांना केले होते.
या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीनंतर भुजबळ म्हणाले की, निवडणुकीत इतर घटकांबरोबरच ओबीसींचे महायुतीच्या महाविजयात फार मोठे योगदान होते. ओबीसींचा आशीर्वाद महत्त्वाचा होता. गेल्या काही दिवसांतील घटना (भुजबळ यांना संधी न मिळणे) मला माहिती आहेत. ओबीसी समाजात नाराजी आहे, लोक रस्त्यावर उतरत आहेत. सध्या सुटीचे आणि नववर्षाचे वातावरण आहे, तेव्हा सर्वांनी शांतता बाळगावी असे माझे आवाहन आहे, आपण निश्चितच काही तोडगा काढू, असे फडणवीस यांनी मला सांगितले. आठ-दहा दिवसांत पुन्हा भेटण्याचे आमचे ठरले आहे. आजच्या भेटीत राजकीय व सामाजिक मुद्यांवर चर्चा झाली असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले...
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेटीनंतर सांगितले की, भुजबळ यांच्याविषयी महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये सन्मानाची भावना आहे. अजित पवार यांनी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला नाही कारण भुजबळ यांनी राष्ट्रीय राजकारणात जावे असे त्यांना वाटते. भुजबळ यांची तशी इच्छा नव्हती. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असून आम्ही तिन्ही पक्षांचे नेते बसून त्यावर योग्य तो तोडगा काढू.