Join us

नितेश राणे, गीता जैन यांच्या भाषणाची तपासणी करा; न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 07:24 IST

द्वेषपूर्ण भाषण न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मीरा रोड हिंसाचाराच्यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे, गीता जैन व टी. राजा सिंग यांनी केलेले कथित द्वेषपूर्ण भाषण पोलिस आयुक्तांनी तपासावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले.

भाषणाच्या ट्रान्सक्रिप्टवरून प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचे दिसते, असे न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने म्हटले. कोणताही राजकीय दबाव आणि पक्षपातीपणा टाळण्यासाठी पोलिस आयुक्तांनी वैयक्तिकपणे भाषण आणि ट्रान्सक्रिप्ट तपासलेले योग्य होईल, असे न्यायालयाने म्हटले. मीरा-भाईंदर येथील पोलिस आयुक्तांच्या कार्यालयातूनच राणे यांनी पत्रकार परिषद घेतल्याची माहिती याचिकादारांनी न्यायालयाला दिली. मात्र, न्यायालयाने ती मान्य करण्यास नकार दिला. असे कार्यक्रम यापुढे पोलिस ठाण्याच्या आवारात घेण्यात येऊ नयेत. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास कमी होईल आणि पोलिस निष्पक्षपाती असतात, यावरही विश्वास बसणार नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

राणे, जैन व टी. राजा यांनी मीरा-भाईंदर हिंसाचारादरम्यान द्वेषपूर्ण भाषणे दिली. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली, तरी त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मुंबईच्या तीन रहिवाशांनी व मीरा भाईंदरच्या हिंसाचारातील दोन पीडितांनी केली आहे. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी आयोजकांविरोधात पोलिसांचे आदेश न पाळल्याबद्दल गुन्हा दाखल केला, असे याचिकादारांनी न्यायालयाला सांगितले. ‘अशा एफआयआरमुळे पोलिसांचीच प्रतिष्ठा मलिन होत आहे. कोणीही यावे आणि काहीही बोलावे, असा संदेशच लोकांना मिळेल, असे न्यायालयाने म्हटले.

अप्रिय घटना घडू नये, याची खबरदारी घ्या रामनवमीला अशा सांस्कृतिक फेरीचे नियंत्रण करणे आणि व्यवस्थापन करणे कठीण होते, असे मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने १७ एप्रिल रोजी असणाऱ्या रामनवमीदरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेण्याची सूचना पोलिसांना करत या याचिकेवरील पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी ठेवली.

टॅग्स :मुंबईनीतेश राणे निवडणूकलोकसभा निवडणूक २०२४