“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 21:12 IST2025-12-06T21:09:46+5:302025-12-06T21:12:50+5:30
Deputy CM Eknath Shinde News: सीएच्या कामातील पारदर्शकता, लेखापरीक्षणाची काटेकोरता आणि अर्थकारणातील शिस्त किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित होते, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
Deputy CM Eknath Shinde News: चार्टर्ड अकाउंटंट्स हे देशाचे भावी आर्थिक शिल्पकार आहेत आणि ज्ञान, विनय, प्रामाणिकपणा तसेच आर्थिक शिस्त या गुणांमुळे राष्ट्र अधिक सक्षम होते. देशाचे भविष्य उज्ज्वल असून त्या भविष्यात महाराष्ट्राची निर्णायक भूमिका राहणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भारतीय सनदी लेखाकार संस्थान ( ICAI) – वेस्टर्न इंडिया रीजनल कौन्सिलच्या विद्यार्थ्यांच्या परिषदेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
एकनाथ शिंदे यांनी मुंबईत उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करताना ठाण्याने त्यांना घडवले असल्याचा उल्लेख केला आणि ठाणे–मुंबई परिसरात पूर्ण झालेल्या कोस्टल रोड, अटल सेतु, मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला असून पायाभूत सुविधांच्या विकासामुळे महाराष्ट्राची गती वाढली असल्याचे नमूद केले.
महाराष्ट्र आज जीडीपीमध्ये देशात प्रथम क्रमांकावर असून स्टार्टअप्सच्या क्षेत्रातही राज्य अग्रस्थानी आहे. दावोस आर्थिक परिषदेत राज्याला सात लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुक शक्य झाली. मुंबई–महा प्रदेशात १.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभी राहण्याची क्षमता नीती आयोगानेदेखील मान्य केली आहे. परिषदेच्या ‘नॉलेज फ्रॉम ग्राउंड झिरो’ या थीमचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की ज्ञान माणसाला जितके विनम्र करते तितकेच त्याला बौद्धिक उंचीवर नेते. डॉक्टर जसा रुग्णाचे आरोग्य तपासतो तसा देशाच्या आर्थिक आरोग्याची तपासणी करण्याचे काम चार्टर्ड अकाउंटंट करतो, असेही ते म्हणाले.
युवा सीए विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा
विनोदी शैलीत बोलताना शिंदे म्हणाले की जीवनात दोनच लोकांकडून नियमित ‘खर्चाचा हिशोब’ विचारला जातो. एक घरी पत्नी आणि दुसरा चार्टर्ड अकाउंटंट! त्यामुळे सीए च्या कामातील पारदर्शकता, लेखापरीक्षणाची काटेकोरता आणि अर्थकारणातील शिस्त किती महत्त्वाची आहे हे अधोरेखित होते, असे त्यांनी नमूद केले. विकास फक्त पैशांवर अवलंबून नसून योग्य धोरणांची अंमलबजावणी, पारदर्शकता आणि वित्तीय शिस्त या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. फिनटेक क्षेत्रात मुंबईला ग्लोबल फिनटेक कॅपिटल बनण्याची क्षमता असून युवा सीए विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास जनतेच्या विश्वासामुळे
बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हे त्रिसूत्र आजही देशासाठी मार्गदर्शक असल्याचे सांगताना शिंदे यांनी नेल्सन मंडेला यांच्या शिक्षणावरील विचारांचाही उल्लेख केला. आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना ते म्हणाले की शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास जनतेच्या विश्वासामुळे आणि आपल्या समर्पणामुळे शक्य झाला. भारतीय अर्थव्यवस्थेने मागील १०-११ वर्षांत मोठी झेप घेतली असून भारत जगातील पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर जाण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोविडच्या काळात भारताने अनेक देशांना लस पुरवून कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले आणि त्यामुळे भारताचे जागतिक नेतृत्व आणखी मजबूत झाले, असेही ते म्हणाले.
दरम्यान, समारोप करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला की, तुम्ही नवी पिढी आहात, देशाचे भविष्य तुमच्या हातात आहे. प्रामाणिकपणा, मेहनत आणि निष्ठा कधीही सोडू नका. अडचणींना न घाबरता सतत पुढे चला. महाराष्ट्र थांबायला नको, तो नेहमी पुढे जात राहिला पाहिजे.