Charkop assembly constituency: 50% slum dweller decides to vote | चारकोप विधानसभा मतदारसंघ : पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांचे मत ठरणार निर्णायक
चारकोप विधानसभा मतदारसंघ : पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांचे मत ठरणार निर्णायक

- गौरी टेंबेकर
मराठी आणि गुजराती भाषिकांचे प्रमाण अधिक असलेल्या चारकोप मतदारसंघात भाजपचा प्रभाव अधिक राहिला आहे. २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजपलाच आपली पसंती दिली होती. तर शिवसेना दुसऱ्या क्रमाकांवर होती.

मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेने येथील मतदारांना आपल्याकडे बºयापैकी आकर्षित करण्यात यश मिळविले आहे. विजयाची माळ मात्र भाजपच्याच गळ्यात पडली. भाजपचे विद्यमान आमदार योगेश सागर यांनी मुंबई महापालिकेत २००० ते २०१२ या कालावधीत नगरसेवक म्हणून काम केले. त्या कालावधीत त्यांना प्रजा फाउंडेशनचा ‘उत्कृष्ट लोकप्रतिनिधी’ पुरस्कारही मिळाला. २००९ मध्ये ते पहिल्यांदा या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. २०१४च्या मोदी लाटेमध्येही मतदारांनी त्यांच्याच पारड्यात मत टाकले. यादरम्यान त्यांनी शहर विकास राज्यमंत्रिपददेखील भूषविले.

चारकोपमध्ये काँग्रेसला चेहरा नसल्याची चर्चा आहे. व्यावसायिक तसेच बुधेलिया ट्रस्टचे सर्वेसर्वा कालूभाई बुधेलिया आणि नगरसेवकपदाची निवडणूक लढलेले व सध्या ब्लॉक अध्यक्ष असलेले लालजी दुबे हे दोघे पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक आहेत. तुर्तास त्यात बुधेलिया आघाडीवर आहेत. आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान असल्याने पक्ष त्यांच्या नावाचा विचार करेल, अशी हवा आहे.

चारकोपमध्ये मेट्रोचे यार्ड तयार केले जाणार होते. त्यामुळे त्या ठिकाणी वसलेले हजारो झोपडपट्टीवासीय बेघर होण्याची शक्यता होती. प्रस्तावित भूखंड हा यार्डसाठी लागणाºया जागेसाठी अपुरा पडत आहे. परिणामी, मेट्रोची कारशेड आता मालाडच्या एकतानगर परिसरात असलेल्या मांजरा ट्रस्टच्या जागेत हलविण्यात आली आहे. त्यातून चारकोपमध्ये झोपडपट्टीवासीयांच्या डोक्यावर असलेली बेघर होण्याची तलवार दूर झाल्याचे मानले जाते. याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न आता प्रत्येक पक्षाकडून सुरू झाला आहे.

या भागातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या वसाहतींमध्ये रस्ते, पाणी आणि स्वच्छतेची समस्या आहे. नाले आणि गटारांची कामे अर्धवट झाल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरते. त्यात मोठे नुकसान होते. या समस्येचे समाधान करण्यात विद्यमान लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा उचलून धरला जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिनेश साळवी यांच्या नावाची चर्चा आहे. या परिसरात कोळी समजाचीही वस्ती आहे; मात्र त्यांना मासळीबाजार उपलब्ध नसल्याने मासेविक्रीसाठी मालाडच्या बाजारात जावे लागते. रस्ते आणि पादचारी मार्गावरील फेरीवाल्यांची समस्यादेखील मोठी आहे. सेक्टर ८ आणि ९ मध्ये पाण्याच्या समस्येचे समाधान अद्याप झालेले नाही. समस्यांनी ग्रासलेल्या या मतदारसंघातील कौल हा ५० टक्क्यांपेक्षा जास्त असलेला झोपडपट्टीवासीय ठरवणार आहे. (उद्याच्या अंकात -
सायन कोळीवाडा मतदारसंघ)

Web Title: Charkop assembly constituency: 50% slum dweller decides to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.