Airfares Soar: मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 12:08 IST2025-12-06T12:07:53+5:302025-12-06T12:08:28+5:30
Flight Fare Hike: मुंबई ते बंगळुरू या प्रवासाचे दर ४० हजारांच्या घरात गेले आहेत, तर मुंबई ते चेन्नई, हैदराबाद, कोलकाता या प्रमुख शहरांसाठी तिकिटांचे दर हे ५० हजारांच्याच घरात गेले आहेत.

Airfares Soar: मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
मुंबई : देशाच्या विमान क्षेत्रात ६२ टक्क्यांपेक्षा जास्त मार्केट हिस्सेदारी असलेल्या इंडिगो कंपनीच्या विमानांचा बोजवारा उडाल्याचा फायदा अन्य विमान कंपन्यांना होत असल्याचे उघड झाले आहे. मुंबई ते पुणे विमान प्रवासाचे दर तब्बल ६७ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहेत. याखेरीज सर्वांत व्यग्र हवाई मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई ते दिल्ली या विमान प्रवासाचे दर ५५ हजार ते ७२ हजार रुपयांवर गेले आहेत.
मुंबई ते बंगळुरू या प्रवासाचे दर ४० हजारांच्या घरात गेले आहेत, तर मुंबई ते चेन्नई, हैदराबाद, कोलकाता या प्रमुख शहरांसाठी तिकिटांचे दर हे ५० हजारांच्याच घरात गेले आहेत. ग्राहक कोणत्या वेळेचे विमान पसंत करतो, त्यानुसार विमान प्रवासाचे दर बदलत असतात. मात्र, सध्या विमान तिकिटांचे बुकिंग करणाऱ्या कोणत्याही संकेतस्थळावर दिवसाच्या कोणत्याही वेळेचे दर तपासले तर त्या मार्गावरील नियमित दरापेक्षा किमान तीन पटीने अधिक दर वाढले आहेत.
वाढीव दराने तिकिटे काढूनही विलंब
धक्कादायक गोष्ट म्हणजे ग्राहकांनी वाढीव दराने विमानाची तिकिटे काढली असली तरी अन्य विमान सेवादेखील काहीशा विलंबाने चालत आहेत. याचे कारण म्हणजे आजच्या घडीला इंडिगोच्या ताफ्यात सर्वाधिक विमाने आहेत आणि देशातील प्रमुख विमानतळांवरील त्यांच्या स्लॉटमध्येच ती उभी आहेत. त्यामुळे ती विमाने तिथून हलविल्याशिवाय अन्य विमानांना ते स्लॉट उपलब्ध होण्यास अडचण होत आहे. परिणामी, अन्य विमानेदेखील काहीशा विलंबाने उड्डाण घेत आहेत.
पुण्यात ९ ठिकाणी इंडिगोची उड्डाणे रद्द
पुण्यामध्ये १० विमान स्लॉट आहेत. यापैकी ९ ठिकाणी इंडिगोची रद्द झालेली विमाने उभी आहेत. त्यामुळे पुण्यातून विमान सेवा देणाऱ्या अन्य विमानांना जागा उपलब्ध होण्यास समस्या
उद्भवत आहेत.