मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 05:32 IST2025-12-04T05:31:40+5:302025-12-04T05:32:40+5:30
flights delayed due to operational issues: मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू अशा देशातील जवळपास सर्वच प्रमुख विमानतळांवरील संगणकीय प्रणाली मंदावली.

मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ
मुंबई : विमानतळांवरविमान कंपन्यांच्या संगणकीय प्रणालीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे बुधवारी देशभरातील विमान सेवेमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद येथून तब्बल २०० विमाने रद्द करण्यात आली, तर अनेक विमानांनी किमान ३ ते कमाल ८ तास उशिराने उड्डाण केले.
वाराणसी येथील विमानतळावरील संगणकीय प्रणालीमध्ये सर्वप्रथम तांत्रिक दोष निर्माण झाला. त्यापाठोपाठ मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू अशा देशातील जवळपास सर्वच प्रमुख विमानतळांवरील संगणकीय प्रणाली मंदावली. यामुळे प्रवाशांना संगणकाद्वारे चेक-इन करणे शक्य झाले नाही.
विमान कंपन्यांनी अनेक प्रवाशांना हाताने बोर्डिंग पास लिहून दिला. यामुळे विमानतळावर प्रचंड गोंधळ झाला होता. विमान सेवेला विलंब का होत आहे, याची नीट माहिती विमान कंपन्यांनी दिली नसल्याचा दावा प्रवाशांनी केला असून, त्याविरोधात संताप व्यक्त केला.
हैदराबाद येथून रात्री १२ च्या विमानाने मुंबईत येणाऱ्या मेघा लाडोळे यांचे विमान सकाळी आठ वाजता हैदराबाद येथून मुंबईकडे निघाले. त्यामुळे त्यांचे अमेरिकेला जाणारे विमान हुकले. त्यांना थेट गुरुवारी पहाटे ४ च्या विमानाने प्रवासाची सोय करून देण्यात आली.
मेघा लाडोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, हैदराबाद येथे इलेक्ट्रॉनिक बोर्डावर वेळ अचूक दाखवत होते. पण, विमानाला विलंब का होत आहे, याची माहिती मात्र विमान कंपन्यांचे कर्मचारी देत नव्हते. त्यामुळे प्रवासी आणि विमान कंपन्यांचे कर्मचारी यांच्यात जोरदार वादावादी झाली.
मुंबईत प्रवासी, कर्मचाऱ्यांमध्ये वाद
अमेरिकेला जाणाऱ्या मेघा लाडोळे मुंबईत दाखल झाल्या, त्यावेळी विमानतळावर प्रचंड गर्दी होती. प्रवासी आणि विविध विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत असल्याचे आपण पाहिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या तांत्रिक दोषाचा सर्वाधिक फटका इंडिगो, एअर इंडिया, स्पाईसजेट, अकासा एअर या कंपन्यांना बसला. संध्याकाळी उशिरापर्यंत हा गोंधळ सुरूच होता.