अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन असून, त्यापूर्वी ईद ए मिलाद असल्याने राज्य सरकारने मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात सुट्टीमध्ये बदल केला आहे. वार्षिक सुट्ट्या जाहीर करताना शुक्रवारी, ५ सप्टेंबर रोजी ईद ए मिलादचीसुट्टी जाहीर केलेली आहे. मात्र, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ईद ए मिलादची सुट्टी सोमवारी असणार आहे. तशी घोषणा राज्य सरकारने केली आहे.
राज्य सरकारच्या प्रशासकीय विभागाकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत. ईद ए मिलादची सुट्टी राज्यात ५ सप्टेंबर रोजीच असणार आहे. तर मुंबई आणि मुंबई उपनगरमधील ८ सप्टेंबर रोजी असणार आहे.
ईद ए मिलादची मिरवणूक आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गणपती विसर्जन असल्याने पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेवर ताण वाढणार होता. यासंदर्भात २१ ऑगस्ट रोजी मुस्लीम संघटनांचे प्रतिनिधींची बैठक झाली. सामाजिक सौहार्दता राहावी आणि शांततेत उत्सव पार पडावा म्हणून मुस्लीम संघटनांच्या प्रतिनिधिंनी ईद ए मिलादची सुट्टी पुढे ढकलण्याला संमती दिली.
त्यानंतर उप सचिव दिलीप देशपांडे यांनी मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ईद ए मिलादची सुट्टी ८ सप्टेंबर रोजी असेल, यासंदर्भातील आदेश काढले. डिसेंबर २०२४ मध्ये सरकार जाहीर केलेल्या शासकीय सुट्ट्यांनुसारच राज्यात ईद मिलादची सुट्टी ५ सप्टेंबर रोजीच असणार आहे.