Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बावनकुळेचं ते वक्तव्य अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं, सरकारने कारवाई करावी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 22:36 IST

NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न सोडून दिले पाहिजे असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा केला आणि राज्यात बेईमानीने सत्ता मिळविली. पण, आम्ही सावध आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही किमान २०० जागा जिंकू, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. त्यानंतर, बावनकुळेंच्या या विधानावर राष्ट्रवादीने आक्षेप घेतला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारला दाभोळकरांची आठवण करुन दिली आहे.  

NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न सोडून दिले पाहिजे असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. सातारा जिल्ह्याचा संघटनात्मक प्रवास करताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा करणारे भोंदूबाबा कोण आहे ते सर्व देशाला आणि महाराष्ट्राला माहिती आहे. एकदा कोणी शरद पवार यांच्या तावडीत सापडले की, सुटत नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाचे सर्व काही स्वीकारले आहे. आता फक्त काँग्रेसचे संविधान त्यांनी स्वीकारायचे बाकी आहे. आपल्या पक्षाचे संविधान म्हणून काँग्रसेच्या संविधानाची नक्कल करून निवडणूक आयोगाला सादर करावी असं त्यांनी म्हटलं आहे. 

बावनकुळेंच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीने विरोध करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले वक्तव्य हे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असून सरकारने याची तात्काळ दखल घेऊन बावनकुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा हा महाराष्ट्र आहे हे सिद्ध करावे, असे ट्विट आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. त्यामुळे, खरंच आता बावनकुळेंवर कारवाई होणार का, हे पाहावे लागणार आहे.  

बावनकुळेंनी मेंदूचा आधी तपास करुन घ्यावा - राष्ट्रवादी

जादूटोणा, भोंदूबाबा हे शब्द सभ्य संस्कृतीतील नाहीत. राजकारण करायचं असेल तर मुद्दयावर राजकारण करा असा इशारा देत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी बावनकुळे यांचा समाचार घेतला. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा कुठल्या सरकारने आणला याचा विसर बावनकुळे यांना पडला असावा. शरद पवार यांची पकड महाराष्ट्रावर आहे. तुमच्यासारख्या जातीयवादी पक्षाच्या तावडीतून शिवसेनेला मुक्त करुन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले ही किमया पवारांनी आहे. त्यामुळे २९ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल तेव्हा तुमचे सरकार पायउतार होणार हे निश्चित आहे. त्यानंतर तुम्हाला जादूटोणा जे काही करायचं ते करा असेही महेश तपासे यांनी बावनकुळे यांना सुनावले.  

टॅग्स :चंद्रशेखर बावनकुळेअमोल मिटकरीराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार