Join us

'चंद्रकांत पाटील यांची वेगळीच तऱ्हाय, एकंदरीत सगळीच गंमतय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 08:09 IST

संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून रोखठोक या सदराखाली चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या आणि भाजपची जोरदार खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा, किती मनोरंजन कराल?

ठळक मुद्देकोरोनाचा कहर आणि लॉक डाऊनचे निर्बंध कायम असले तरी आपल्या देशातील राजकीय मनोरंजनाचे कार्यक्रम सुरूच आहेत. लॉक डाऊनचे निर्बंध काही प्रमाणात उठले, पण नाटक, सिनेमा थिएटर्स उघडण्यासंदर्भात निर्णय झाला नाही

मुंबई - शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद आता महाराष्ट्राला नवा राहिला नाही. त्यात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील शाब्दीक कलगीतुरा नित्याचाच झाला आहे. दुसरीकडे माजी खासदार किरीट सोमय्यांनी मंत्रिमंडळातील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करुन वातावरण दणाणून सोडलं आहे. तर, संबंधित मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन ते पत्रकार परिषदाही घेत आहेत. यावरुन, संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांची 'रोखठोक' खिल्ली उडवली आहे.  

संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून रोखठोक या सदराखाली चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या आणि भाजपची जोरदार खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा, किती मनोरंजन कराल? या मथळ्याखाली राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. 'महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या रोज सकाळी उठून मंत्र्यांवर नवा आरोप करतात व त्या मंत्र्यांच्या मतदारसंघात दौरे काढतात. सरकारने त्यांचे दौरे रोखू नयेत असे मला वाटते. चंद्रकांत पाटील यांची वेगळीच तऱ्हा आहे. पंतप्रधान मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी 'कोव्हॅक्सिन' लस घेतली, पण कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली नाही, तरीही मोदी वॉशिंग्टनला उतरले! एकंदरीत सगळीच गंमत आहे.', असे राऊत यांनी म्हटले आहे. 

सिनेमा नाट्यगृहांची गरजच काय

कोरोनाचा कहर आणि लॉक डाऊनचे निर्बंध कायम असले तरी आपल्या देशातील राजकीय मनोरंजनाचे कार्यक्रम सुरूच आहेत. लॉक डाऊनचे निर्बंध काही प्रमाणात उठले, पण नाटक, सिनेमा थिएटर्स उघडण्यासंदर्भात निर्णय झाला नाही. त्यामुळे लोक राजकीय बातम्यांतूनच स्वतःचे मनोरंजन करून घेत आहेत. गेल्या काही दिवसांतील आपल्या राजकारण्यांच्या भूमिका, विधाने पाहिली की महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आता सिनेमा आणि नाट्यगृहांची खरेच गरज आहे काय, असे वाटते. सर्वत्रच विनोद व रहस्यमय असे मनोरंजन सुरू आहे. 

सीबीआय अन् ईडीचीही हास्यजत्रा केलीय

राजकारण्यांकडून विविध पातळय़ांवर मनोरंजन होतच असते. सध्याच्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांची 'हास्यजत्रा'च केली आहे. किरीट सोमय्या हे भाजपचे माजी खासदार रोज सकाळी उठून महाविकास आघाडीतील एका मंत्र्यावर आरोप करतात. त्यांचे आरोप हे साबणाचे बुडबुडेच ठरतात. महाराष्ट्राला व देशाला सुसंस्कृत विरोधी पक्षाची परंपरा आहे. दिल्लीत मधू दंडवते, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, कॉ. हिरेन मुखर्जी यांनी काँग्रेस सरकारविरोधात जोरदार मोहिमा राबवल्या. अनेक भ्रष्टाचार उघड केले. इंदिरा गांधी, संजय गांधीही त्यातून सुटले नाहीत. महाराष्ट्रात दत्ता पाटील, मृणाल गोरे, केशवराव धोंडगे, कृष्णराव धुळपांपासून गोपीनाथ मुंडेंपर्यंत अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला घाम फोडला, पण त्यात आजच्यासारखा विखार नव्हता. शिवाजीराव निलंगेकर, बॅ. अंतुले, विलासराव देशमुख यांनाही विरोधी पक्षाच्या जोरदार हल्ल्यांमुळेच जावे लागले, पण आजच्या विरोधी पक्षाप्रमाणे त्यांच्याकडे 'हास्यजत्रा' म्हणून पाहिले जात नव्हते!

अजित पवार सटकले

चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत. पाटील म्हणतात, शंभर अजित पवार खिशात घेऊन देवेंद्र फडणवीस फिरतात. हे विधान गमतीचेच आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या 72 तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले. तेथे शंभर अजित पवार भाजपला कसे झेपणार? पण पाटील यांनी महाराष्ट्राचे मनोरंजन करायचे ठरवलेच असेल तर त्यांना कोण थांबवणार? 'ईडी'च्या नावाने धमक्या द्यायच्या व चिखलफेक करायची हेच त्यांचे काम. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकांना टीका सहन करावीच लागते. वागताना, बोलताना तारतम्य ठेवावे लागते, असे राऊत यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :शिवसेनासंजय राऊतचंद्रकांत पाटीलभाजपाकिरीट सोमय्या