सकारात्मक ऊर्जेचे चैतन्यमयी उदाहरण म्हणजे, महिला अधिकारी पुष्पा चव्हाण!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 06:33 AM2018-10-10T06:33:56+5:302018-10-10T06:34:19+5:30

आव्हानांना, संकटांना सामोरे जाण्याची ऊर्जा असेल, तर क्षेत्र कुठलेही असो, समस्यांचा अंधार कितीही गडद असो, तिथे यशाचा लख्ख प्रकाश पडतोच, जो इतरांनाही सकारात्मक ऊर्जेची महती पटवून देतो.

Chaitanya exemplary positive energy, women officer Pushpa Chavan! | सकारात्मक ऊर्जेचे चैतन्यमयी उदाहरण म्हणजे, महिला अधिकारी पुष्पा चव्हाण!

सकारात्मक ऊर्जेचे चैतन्यमयी उदाहरण म्हणजे, महिला अधिकारी पुष्पा चव्हाण!

googlenewsNext

- सचिन लुंगसे

आव्हानांना, संकटांना सामोरे जाण्याची ऊर्जा असेल, तर क्षेत्र कुठलेही असो, समस्यांचा अंधार कितीही गडद असो, तिथे यशाचा लख्ख प्रकाश पडतोच, जो इतरांनाही सकारात्मक ऊर्जेची महती पटवून देतो. याच सकारात्मक ऊर्जेचे चैतन्यमयी उदाहरण म्हणजे, महावितरणमधील अभियंता पदावर असलेल्या पहिल्या महिला अधिकारी पुष्पा चव्हाण!

शिक्षिका असलेली आई शकुंतला सोळंके या पुष्पा चव्हाण यांचा आदर्श. आई शकुंतला तिसरीत असताना त्यांच्या आईवडिलांचे निधन झाल्यानंतरही, जिद्दीने शिक्षण पूर्ण करणाऱ्या आणि शिक्षिका होऊन भावी पिढी घडविणाºया आपल्या आईप्रमाणे कर्तृत्वाचा ठसा उमटवायचा, हे पुष्पा चव्हाण यांचे स्वप्न होते. आईवडिलांच्या प्रेमळ साथीने या स्वप्नाला पूर्ततेचे पंख लाभले. १९८७ साली त्यांनी बीई इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग केले. त्यानंतर, १९८९ साली महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून सेवेत रुजू झाल्या.
एकाग्रता, कामाविषयी निष्ठा, प्रचंड मेहनत करण्याची तयारी, सहकाºयांना हाताळण्याचे कौशल्य या बळावर त्यांची कारकिर्द घडत गेली. यातूनच पुढे २०१५ मध्ये महातिवरणच्या मुख्य अभियंता पदावर नियुक्त होणाºया त्या पहिल्या महिला ठरल्या. तांत्रिक क्षेत्रात वरिष्ठ पदी महिला अधिकारी दिसणे दुरापास्तच. मात्र, यास भांडुप नागरी परिमंडळाच्या मुख्य अभियंता चव्हाण अपवाद आहेत. स्त्री म्हणून कर्तव्यात कुठेही मर्यादा पडू न देता, पुरुषांच्या बरोबरीने कार्याचा ठसा उमटवत आहेत.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या तब्बल सत्तर वर्षांनंतर घारापुरी बेटावर वीज पोहोचवायची होती. या प्रकल्पाची शेवटच्या टप्प्यातील महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची जबाबदारी चव्हाण यांच्यावर होती. ती यशस्वीपणे पार पाडत प्रकल्पांतर्गत महावितरणने प्रथमच दीड मीटर समुद्र तळाखालून सुमारे ७.५ किमीची वीज वाहिनी टाकून बेटावर वीज पोहोचवली.
भांडुप नागरी परिमंडळांतर्गत सुमारे १८ लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देण्यासाठी सुमारे २,८५८ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. परिमंडळाची वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे ६ हजार कोटी आहे. हा व्याप, तसेच घराची जबाबदारीही त्या सहकारी, पती, माहेर, सासरच्या मंडळींच्या साथीने समर्थपणे सांभाळत आहेत. विवाहित मोठी मुलगी एमबीबीएस आहे, तर छोटी ‘लॉ’च्या चौथ्या वर्षाला आहे.
काम करताना महिलांनी कुठल्याही कठीण प्रसंगाला न घाबरता परिस्थितीला धीराने सामोरे गेले पाहिजे. यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही आत्मविश्वासने काम करू शकता आणि त्यामुळे तुमचे कर्तृत्व उजळून निघते, हे चव्हाण यांचे अनुभवाचे बोल सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत.

सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रामाणिकपणे, जिद्दीने काम केले, तर त्यामुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. काम करताना समस्या, संकटांची वादळे तर येणारच, पण तुमच्यातील संयम, सकारात्मक ऊर्जाच तुम्हाला ही वादळे यशस्वीपणे क्षमविण्याची ताकद देते. त्यामुळेच नियोजित उद्दिष्टाच्या दिशेकडील मार्गक्रमण सोपे होते.

Web Title: Chaitanya exemplary positive energy, women officer Pushpa Chavan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई