व्यवहाराबाबत सीईओ अनभिज्ञ, न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळ्याचा तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 05:19 IST2025-02-19T05:17:40+5:302025-02-19T05:19:05+5:30
दुसरीकडे २०२१ पासून आरबीआयच्या देखरेखीअंतर्गत न्यू इंडियाचा कारभार असतानादेखील हा घोटाळा कसा झाला? यामध्ये आरबीआयच्या काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे का? याचा आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे.

व्यवहाराबाबत सीईओ अनभिज्ञ, न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळ्याचा तपास सुरू
मनीषा म्हात्रे
मुंबई : न्यू इंडिया को. ऑप. बँक घोटाळ्याबाबत तपास पथकाकडून बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अभिमन्यू भोअनकडे चौकशी सुरू केली आहे. मात्र, इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेले सीईओ बँकेच्या व्यवहाराबाबत अनभिज्ञ असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दुसरीकडे २०२१ पासून आरबीआयच्या देखरेखीअंतर्गत न्यू इंडियाचा कारभार असतानादेखील हा घोटाळा कसा झाला? यामध्ये आरबीआयच्या काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे का? याचा आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे.
न्यू इंडिया को. ऑप. बँकेत गडबड सुरू असल्याची चाहूल लागताच २०२१ मध्ये आरबीआयने देखरेख ठेवण्यास सुरुवात केली. तरी देखील चार वर्षांनी हा घोटाळा उघड झाला. याचे ऑडिट रिपोर्ट आर्थिक गुन्हे शाखेने मागवले आहे. एवढी मोठी रोकड ठेवण्यामागे काय उद्देश होता? बँक सर्व रोकड स्वरूपात पैसे घेऊन बंद करण्याच्या मार्गावर होती का? त्या दिशेनेही तपास सुरू आहे. मेहताकडून तपासाला सहकार्य मिळत नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त मंगेश शिंदे यांच्या नेतृत्वात पथकाने मंगळवारी बँकेच्या प्रभादेवीतील मुख्यालयात तळ ठोकला. यावेळी बरेच दिवस सुट्टीवर असलेल्या अभिमन्यू यांच्याकडे घोटाळ्याबाबत पथकाने चौकशी सुरू केली.
...आणि सुट्टीवर गेले
आरबीआयच्या तपासणी होणार असल्याचे समजताच १२ फेब्रुवारीला भोअन हे सुट्टीवर जात त्यांच्या जागी देवर्षी घोष यांना आरबीआयला माहिती देण्याची जबाबदारी देण्यात आली.
या व्यवहारासंबंधित त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांना काही माहिती नसल्याबाबत उत्तरे मिळत असल्याचेही सूत्रांकडून समजते आहे.
एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीला बँकेतील प्राथमिक प्रश्नांची उत्तरे माहिती नसल्यामुळे संशयात भर पडली आहे.
पाच वर्षांनंतर मुदतवाढ
इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असलेला अभिमन्यूने एमबीए शिक्षण घेतले. बँकिंग क्षेत्राबाबत त्यांनी कुठलेही शिक्षण घेतले नसल्याचे यावेळी समोर आले. २००७-०८ पासून ते बँकेत कार्यरत आहे. सुरुवातीला बँकेत आयटी विभागात ते कार्यरत होते. त्यानंतर सीईओ म्हणून त्यांनी पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर त्यांना मुदतवाढही मिळाली. त्यांच्या अंतर्गत सर्व शाखांचा कारभार सुरू होता.