मध्य रेल्वेने चार महिन्यांत ७४ टन मालाची वाहतूक, गेल्या १५ वर्षांमध्ये सर्वाधिक नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:09 IST2025-08-04T13:08:51+5:302025-08-04T13:09:22+5:30
मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि नवी मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्टमुळे समुद्रमार्गाने मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक होत आहे.

मध्य रेल्वेने चार महिन्यांत ७४ टन मालाची वाहतूक, गेल्या १५ वर्षांमध्ये सर्वाधिक नोंद
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने यंदा एप्रिल ते जुलैदरम्यान ७४ लाख टन मालवाहतूक करत १५ वर्षांतील सर्वाधिक नोंद केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ७३ लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली होती. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात मालवाहतुकीत १.५ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. यामध्ये कोळसा, खत यासह जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचा समावेश आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि नवी मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्टमुळे समुद्रमार्गाने मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक होत आहे. या बंदरांत उतरविण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तूंची रेल्वे मार्गाने देशभरात वाहतूक करण्यात येते. या पार्श्वभूमीवर जेएनपीएमधून जुलैमध्ये एकूण ६४७ रेकची वाहतूक झाली आहे. जानेवारीमध्ये हा आकडा ६४१ एवढा होता. तसेच जुलैमध्ये दररोज सरासरी १,६१४ वॅगन्सची वाहतूक झाली आहे.
खतासह कोळशाची केली वाहतूक
कोळशाच्या वाहतुकीमध्येही यंदा ४१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून जुलैमध्ये ६८ कोळसा रेकची वाहतूक करण्यात आली. मागील वर्षी हाच आकडा ४८ रेकची असा नोंदवण्यात आला होता. या महिन्यात कळंबोली माल शेडमधून एकूण २८८ खत रेकची वाहतूक करण्यात आली.
रेक लोडिंग आणि अनलोडिंग
जुलैमध्ये एकूण १,१४५ रेक लोड करण्यात आले असून २०२४ मध्ये हेच प्रमाण १,०१८ रेक इतके होते. यंदा त्यात १२ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. रेक अनलोडिंगचा यंदा जुलैमधील आकडा १,१०४ असा नोंदवण्यात आला असून मागील वर्षी तोच ९०५ वर होता. यंदा एप्रिल ते जुलै या कालावधीत एकूण ४,१०० रेकची वाहतूक करण्यात आली असून गेल्या वर्षी हे प्रमाण ३,९५१ रेक एवढ होते. याच कालावधीत एकूण ४,२०० रेक अनलोड झाले असून २०२४ मध्ये हा आकडा ३,७९६ एवढा नोंदवण्यात आली होता.