Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेर संपला आहे. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मतदानाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
मध्य रेल्वेने निवडणूक कर्मचारी आणि मतदारांच्या प्रवाशांसाठी, १९ ते २० नोव्हेंबर आणि २० ते २१ नोव्हेंबर दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. मतदारांना मतदान केंद्रांवर पोहोचण्यात कोणतीही अडचण येऊ नये आणि निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वेळेवर त्यांच्या कर्तव्यावर पोहोचणे सोपे जावे यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
या विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान चालवल्या जातील. रात्रीच्या वेळी जास्त संख्येने गाड्या चालवल्या जातील जेणेकरून मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासाठी सहज प्रवास करता येईल. या विशेष उपनगरीय गाड्या रात्री चालवल्या जात असल्याने मतदार आणि निवडणूक कार्यकर्त्यांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे, असं मध्य रेल्वेने म्हटलं आहे.
मध्य रेल्वेने विशेष उपनगरीय गाड्यांच्या सुटण्याच्या आणि येण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र, रेल्वेच्या वेळेची माहिती रेल्वेकडून प्रवाशांना लवकरच कळवण्यात येणार आहे. या विशेष गाड्या १९ ते २० आणि २० ते २१ नोव्हेंबरच्या रात्रीच धावतील, जेणेकरून मतदान प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळता येणार आहे.
या काळात रेल्वे सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांवर रेल्वे सेवेची वाहतूक सुरळीत चालवण्याची जबाबदारी असणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या वाढू शकते, त्यामुळे सुरक्षा दलांकडून विशेष दक्षता घेतली जाणार आहे. याशिवाय अधिकाधिक लोकांना या विशेष गाड्यांचा लाभ घेता यावा यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांना ट्रेनच्या कामकाजाच्या वेळा लक्षात घेऊन त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.