मुंबई : कुर्ला बस अपघातानंतर बेस्ट प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यातच बेस्ट बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुरेशी सीसीटीव्ही यंत्रणाही नसल्याचे समोर आले आहे. बेस्टच्या स्वतःच्या ९८९ बसपैकी केवळ ६७ बसमध्ये सीसीटीव्ही आहेत. विशेष म्हणजे यातीलटी २५ बसमधील सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. केवळ ४२ बसमधील सीसीटीव्ही सुरू आहेत. बेस्टच्या स्वतःच्या बसमध्ये सीसीटीव्ही नसल्याने ते बसवण्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, याचीही माहिती त्यांच्याकडे नाही. बेस्टच्या स्वतःच्या आणि भाडेतत्त्वावरील बसने दररोज ३१ लाख ५० हजार प्रवासी प्रवास करतात. कुर्ला येथे बेस्ट बसला अपघात झाला ती बस भाडेतत्त्वावरील होती.
त्यामुळे भाडेतत्त्वावरील बस प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त आहे का? असा सवाल केला जात आहे. 'बेस्ट'ने ताफ्यात ई-बसचा समावेश केल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय झाला. सद्यः स्थितीत बेस्टच्या स्वतःच्या व भाडेतत्त्वावरील २,८८९ बस प्रवासी सेवेत आहेत. मात्र, अनेक बसमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. तांत्रिक बिघाडामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे स्पष्टीकरण बेस्ट उपक्रमाने दिले आहे.
उद्या आंदोलन
बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास पालिका प्रशासनाने नकार दर्शविल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
पालिकेच्या भूमिकेच्या निषेधार्थ बेस्ट कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली २६ डिसेंबरला बेस्ट कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनीही काळ्या फिती लावून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन कामगार सेनेने केले आहे.
बेस्ट उपक्रमाच्या बऱ्याच बसगाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आढळतात, परंतु दुर्दैवाने त्यातील दहा ते बारा टक्के कॅमेरेच सध्या सुस्थितीत आहेत. बाकी कॅमेरे बंद आहेत. वास्तविक बेस्टच्या बसगाड्यांमधील सर्व कॅमेरे कार्यरत असायला हवे, शिवाय बस चालकाच्या केबिनमध्ये सुद्धा एक वेगळा सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे अतिशय आवश्यक आहे. कुर्ला बस अपघातावेळी बस चालकाच्या बाजूला कॅमेराच बसविण्यात आला नव्हता. - रुपेश शेलटकर, अध्यक्ष, आपली बेस्ट आपल्यासाठी संस्था