Join us

CcoronaVirus News: पुढील 15 दिवस महत्त्वाचे; सहवासितांच्या शोधावर भर, प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 07:01 IST

आरोग्य विभाग; प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून

मुंबई : रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांचा शोध घेणे कमी केल्यामुळे रुग्णवाढीचा धोका संभवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने सहवासितांचा शोध व निदान यावर अधिकाधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. एका रुग्णामागे किमान २० ते ३० व्यक्तींचा शोध घेण्यात येणार आहे. त्यांच्या चाचण्या करून निदान प्रक्रियेत आणण्यात येईल, असे आरोग्य विभागाने सांगितले. तर, पुढील पंधरा दिवस महत्त्वाचे असून प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले, सहवासितांचा शोध जलदगतीने घेण्याबाबत जिल्हा आणि पालिका पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. याविषयी विशेष परिपत्रकही काढण्यात आले आहे. रुग्णवाढीचा धोका ओळखून आरोग्य विभाग सर्व पातळ्यांवर सतर्कता बाळगत आहे.

रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांचे निदान करून त्यांना उपचारप्रक्रियेत आणण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. यापूर्वी, राज्यासह मुंबईत कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळात सहवासितांच्या शोधावर अधिक भर देण्यात आला होता. त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्यूंत कमालीची घट झाल्याचे दिसून आले. शिवाय, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला. महत्त्वाचे म्हणजे, पाॅझिटिव्हिटी दर हा चार टक्क्यांच्या खाली घसरल्याचे दिसून आले.

संसर्ग आटाेक्यात येईल; प्रशासनाचा दावा

दोन व्यक्तीत सुरक्षित अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यात काेरोनाबाधित रुग्ण वाढल्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. घटलेल्या ‘आरटीपीसीआर’ आणि ‘अँटिजेन’ चाचण्या वाढवल्या आहेत. या चाचण्यांतून नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. चाचण्यांची संख्या वाढवल्यानंतर रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्याही चाचण्या होत असल्याने संसर्ग आटोक्यात येईल, असा प्रशासनाचा दावा आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमहाराष्ट्र सरकार