Join us

Anil Deshmukh: CBI ला धक्का! कोर्टाने याचिका फेटाळली; अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 20:49 IST

Anil Deshmukh: सचिन वाझे, कुंदन शिंदे आणि संजीव पांडे यांच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करावी, अशी मागणी सीबीआयने केली होती. मात्र, सीबीआयची याचिका फेटाळत विशेष सीबीआय न्यायालयाने अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सचिन वाझे, कुंदन शिंदे आणि संजीव पांडे यांच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. 

खंडणी वसुली आणि मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली असून, ईडी आणि सीबीआय या दोन केंद्रीय तपास यंत्रणा या प्रकरणात तपास करत आहेत. अनिल देशमुख हे सीबीआयच्या ताब्यात असून देशमुख यांना आणखी तीन दिवसांची सीबीआय कोठडी मिळावी, अशी विनंती विशेष सीबीआय न्यायालयाकडे करण्यात आली होती. 

आणखी चौकशी करायची असल्याने सीबीआय कोठडीची मागणी

पोलीस दलातील बदल्या आणि नेमणुका याबाबत अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप आहेत त्याची आणखी चौकशी करायची असल्याने ही कोठडी हवी आहे, असे सीबीआयच्या वकिलांनी नमूद केले मात्र, ही विनंती न्यायालयाने अमान्य केली. अनिल देशमुखांना आता २९ एप्रिलपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुख गेल्या ११ दिवसांपासून सीबीआय कोठडीत आहेत. ६ एप्रिल रोजी त्यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर ११ एप्रिल रोजी आणखी पाच दिवसांनी कोठडी वाढवण्यात आली होती.

दरम्यान, अनिल देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे तसेच मुंबई पोलीस दलातील बडतर्फ अधिकारी सचिन वाझे या तिघांच्या न्यायालयीन कोठडीतही आज वाढ करण्यात आली आहे. 

टॅग्स :अनिल देशमुखसीबीआय