परदेशी पळून जाल तर सीबीआयचे ‘सिल्व्हर नोटीस’ अस्त्र लागेल मागे
By मनोज गडनीस | Updated: May 29, 2025 06:20 IST2025-05-29T06:20:14+5:302025-05-29T06:20:48+5:30
इंटरपोलच्या माध्यमातून दोघांना बजावली नोटीस

परदेशी पळून जाल तर सीबीआयचे ‘सिल्व्हर नोटीस’ अस्त्र लागेल मागे
मनोज गडनीस
मुंबई : भारतात आर्थिक गैरव्यवहार करून परदेशात फरार झालेल्या आरोपींभोवती फास आवळण्यासाठी आता सीबीआयने ‘सिल्व्हर नोटिशी’चे अस्त्र वापरले आहे. यामुळे फरार आरोपींनी घोटाळ्याच्या पैशांतून परदेशात गोळा केलेल्या मालमत्तेची माहिती सीबीआयला मिळणार आहे.
इंटरपोलने सिल्व्हर नोटीस हा नवा प्रकार सुरू केला. याचा वापर करत सीबीआयने पहिली नोटीस शुभम शोकीन नावाच्या व्यक्तीला जारी केली आहे. शुभम दिल्लीमध्ये एका परदेशी कौन्सुलेटमध्ये व्हिसा अधिकारी म्हणून काम करीत होता. अर्जदारांना संबंधित देशाचा व्हिसा जारी करून देण्यासाठी तो १५ ते ४५ लाख रुपयांची लाच घेत होता. त्याने या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून गोळा केलेल्या पैशाने दुबईत १५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जमवली आहे. यापूर्वी चौकशीसाठी त्याला ब्लू नोटीस जारी करण्यात आली होती.
दुसऱ्या प्रकरणामध्ये क्रिप्टो करन्सी घोटाळ्याद्वारे ११३ कोटी १० लाख गोळा करीत सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या अमित लखनपाल याच्याविरोधात सिल्व्हर नोटीस जारी करण्यात आली आहे. एमटीसी या नावाने तो क्रिप्टो करन्सीचे व्यवहार करीत होता. अनेक सामान्य गुंतवणूकदारांना त्याने आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत यामध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे याकरिता त्याने भारतीय रिझर्व्ह बँकेची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्याने केलेल्या घोटाळ्याचा तपास ईडीचे अधिकारी करीत असून, ईडीने केलेल्या विनंतीवरून सीबीआयने त्याच्याविरोधात ही सिल्व्हर नोटीस जारी केली आहे.