प्रभादेवीत ई-कॉमर्समध्ये सव्वा कोटीची राेकड लंपास; बायोमेट्रिक लॉक तोडून बनावट चावीने प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:39 IST2026-01-20T12:38:43+5:302026-01-20T12:39:25+5:30
इतर व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण

प्रभादेवीत ई-कॉमर्समध्ये सव्वा कोटीची राेकड लंपास; बायोमेट्रिक लॉक तोडून बनावट चावीने प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बायोमेट्रिक लॉक तोडून चोरांनी एक कोटी ३३ लाख रुपयांची रोकड चोरल्याची घटना प्रभादेवी येथील ई-कॉमर्स कंपनीच्या कार्यालयात घडली. या प्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार सागर रामसजन दुबे (वय २७) हे दाेन मित्रांसह प्रभादेवीतल्या सनशाईन टॉवरमधील कार्यालयात २०१८ पासून ई-कॉमर्सचा व्यवसाय करतात. येथे मोबाइल व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ऑनलाइन व ऑफलाइन विक्री केली जाते. त्यातून जमा झालेली रोकड कार्यालयातील कपाटात ठेवली जात होती. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू असल्याने त्यांनी कोट्यवधीची रक्कम बँकेत जमा केली नाही. दरम्यान, १६ जानेवारी रोजी त्यांनी सायंकाळी सात वाजता कार्यालय बंद केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी १०:५० वाजता कार्यालय उघडण्यासाठी कर्मचारी आले असता त्यांना बायोमेट्रिक मशीन तुटलेले आणि काचेच्या दरवाजाला लॉक असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ मालकांना सांगितले. दुबे व त्यांचे मित्र तत्काळ कार्यालयात दाखल झाले. त्यांनी कपाट तपासले असता रोकड चोरीला गेल्याचे उघडकीस आले.
इतर व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोराने बायोमेट्रिक लॉकचा विद्युत पुरवठा खंडित करून ते निष्क्रिय केले.बनावट चावीने कार्यालयात प्रवेश करून कपाट फोडल्याचे स्पष्ट झाले.या घटनेमुळे प्रभादेवी परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.