Join us  

धक्कादायक! कोरोनाच्या रुग्णाला मनसेच्या नेत्याने रुग्णालयातून पळविले; पोलिसांत तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 10:59 AM

घाटकोपरमधील हिंदुसभा रुग्णालयाते दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित कोरोनाबाधित रुग्ण २१ मे रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते.

मुंबई:  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने मंगळवारी ९० हजारांचा टप्पा पार केला आहे. राज्यातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने सर्वत्र गर्दी वाढत असताना कोरोनाचा संसर्ग होण्याचा वेग कमी होत नसल्याने एकीकडे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र दूसरीकडे मुंबईतील घाटकोपरमध्येमनसेच्या नेत्याने रुग्णालयातून एका कोरोनाच्या रुग्णाला उपचार झाल्यानंतर रुग्णालयातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासंबंधित रुग्णालयाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

घाटकोपरमधील हिंदुसभा रुग्णालयाते दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित कोरोनाबाधित रुग्ण २१ मे रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. रुग्णावर उपचार करत असताना त्यांची प्रकृती गंभीर होत असल्यामुळे त्यांना २५ मे रोजी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टर, निवासी डॉक्टर, स्टाफ नर्स व सफाई कर्मचारी या सर्वांनी अत्यावश्यक सेवा देऊन संबंधित रुग्णाला जीवनदान दिले. 

तसेच राज्य सरकार व महापालिकेने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन रुग्णालयांना ठरवण्यात आलेल्या दराप्रमाणेच बिल आकरण्यात आले. तसेच रुग्णाला बिलामध्ये ट्रस्टीसोबत बोलून सवलत देऊ असं आश्वासन देखील वैद्यकीय संचालकांनी दिले होते. मात्र तरीदेखील संबंधित रुग्ण डॉक्टरांचा सल्ला न घेता व रुग्णालयाचे शिल्लक बिल न भरता गणेश चुक्कल व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी रुग्णाला जबरदस्ती रुग्णालयातून पळवून घेऊन गेले, असा आरोप रुग्णालयाने केला आहे.

सदरच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला नाही व त्या पुढील औषधोउपचार सुद्दा माहिती करुन घेतलेले नाही. पुढील १४ दिवस हे रुग्णांसाठी धोकदायक असू शकतात. संबंधित रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असली तरीदेखील १४ दिवस होम क्वारंटाईन राहणं बंधनकारक आहे. तसे न झाल्यास शेजाऱ्यांना व इतर संपर्कात येणाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे तसे झाल्यास या रुग्णासंबंधी रुग्णालयाचे प्रशासन जबाबदार राहणार नाही, असं रुग्णालयाने तक्रारीत म्हटले आहे. मात्र रुग्णालय खोटं बोलत असल्याचं गणेश चुक्कल यांनी सांगितले आहे.

मनसेचे नेते गणेश चुक्कल यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, सदर रुग्णावर यशस्वी उपचार झाल्यानंतर देखील रुग्णालयात बिल वाढवण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे संबंधित रुग्णाचे बिल जवळपास ३ लाख ८० हजारांहून अधिक झाले होते. हे बिल भरण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर वारंवार रुग्णाच्या नातेवाईकांना फोन करत होते. मात्र हे बिल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांची मानसिक परिस्थिती खालावली होती. तसेच रुग्णावर उपचार झाल्यानंतर त्यांच्यामध्ये कोणतेही कोरोनाची लक्षणं दिसत नव्हती, तरीदेखील रुग्णाला रुग्णायात ठेवण्यात आले होते, असा आरोप गणेश चुक्कल यांनी केला आहे. 

हिंदुसभा रुग्णालयाला आम्ही बिल कमी करण्याची विनंती केली. मात्र रुग्णालय कमी करण्यास तयार नव्हते. तसेच महापालिकेने सावित्री बाई फुले यांच्या योजने अंतर्गत उपचार करा असे निर्देश दिले असताना देखील जास्त बिल आकारण्यात आले आहे, असा आरोप गणेश चुक्कल यांनी लोकमतशी बोलताना केला आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमनसेघाटकोपरराज ठाकरेमुंबई महानगरपालिकापोलिस