Join us

साकीनाक्यातील घटनेत ॲट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 05:55 IST

साकीनाका येथे महिलेवर झालेल्या निर्घृण अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’चाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :साकीनाका येथे महिलेवर झालेल्या निर्घृण अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’चाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तसेच पीडितेच्या कुटुंबीयांना सर्व मदतीची पूर्तता करण्याची सूचना केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने उपाध्यक्ष अरुण हालदार यांनी दिली.

देशभरातून निषेध व्यक्त होत असलेल्या या घटनेची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष हालदार यांनी रविवारी पीडिताची आई, दोन लहान मुलींची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासकामाची माहिती घेतली. त्याबाबत ते म्हणाले, या गुन्ह्यात अट्रॉसिटीची कलमे लावण्यात आली असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली आहे. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये तरतूद असलेली सर्व आवश्यक मदत पीडिताच्या कुटुंबीयांना देण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात तत्काळ ४ लाख ३० हजार रुपये तसेच तितकीच रक्कम आरोपपत्र दाखल झाल्यानंतर द्यावयाची आहे. तसेच त्यांच्या निवासाची व्यवस्था करावयाची असून या सर्व प्रशासकीय बाबीची पूर्तता त्वरित केली जावी, यासाठी पोलिसांना सूचना केल्या आहेत, त्यांच्याकडून या संबंधी सविस्तर  अहवालाची मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :साकीनाकामुंबईगुन्हेगारी