विलेपार्लेत सेटवरून पडून कारपेंटरचा मृत्यू, आर्ट डायरेक्टरविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 14:04 IST2023-08-01T14:03:54+5:302023-08-01T14:04:55+5:30
याप्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात आर्ट डायरेक्टर सतीश गवळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलेपार्लेत सेटवरून पडून कारपेंटरचा मृत्यू, आर्ट डायरेक्टरविरोधात गुन्हा दाखल
मुंबई: विलेपार्ले परिसरात एक सेट तयार करत असताना उंचावरून खाली पडून नितीन पांचाळ (३५) या कारपेंटरचा मृत्यू झाला. याप्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात आर्ट डायरेक्टर सतीश गवळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीनचे वडील चंद्रकांत पांचाळ (६५) यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केले. नितीन हा मुूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरचा रहिवासी आहे. सध्या तो पालघरमध्ये राहत होता. तक्रारीनुसार २४ जुलैपासून नितीन हा सतीश गवळी यांच्यासोबत विलेपार्लेच्या इर्ला रोड परिसरातील एका कंपनीत काम करत होता.
२६ जुलैला नितीन उंचीवर असलेल्या परंचीवरून खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर नितीनला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, गवळी यांनी या कामगारांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट किंवा इतर कोणतीही सुरक्षा उपकरणे पुरवली नव्हती. त्यामुळे नितीन पडल्यानंतर त्याला गंभीर दुखापत झाल्याचे त्याच्यासोबत काम करणारे सहकारी कृष्णा सुतार यांनी सांगितले. २९ जुलैला पहाटे ५ वाजता नितीनने कूपर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.