Join us
Daily Top 2Weekly Top 5

यू टर्नला अडवल्याने पोलिसाच्या पायावर घातली कार! चालकाविरोधात सांताक्रुझमध्ये गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 14:48 IST

याप्रकरणी पोलिसाच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्यात आला.

मुंबई : चुकीच्या रस्त्यावर यू टर्न घेताना अडविल्याच्या रागात कारचालकाने पोलिसाच्या पायावरच कार घातल्याचा प्रकार सांताक्रुझ पश्चिम परिसरात घडला. याप्रकरणी पोलिसाच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्यात आला.

सांताक्रुझ वाहतूक विभागातील पोलिस शिपाई प्रवीण महाडेश्वर (३८) हे थर्टी फर्स्टच्या रात्री सांताक्रुझ पश्चिमेतील रॉयल जंक्शन परिसरात तैनात होते. तेव्हा उत्तर रात्री १:१५ च्या सुमारास एक कार जुहू तारा रोडने आली आणि रॉयल जंक्शन येथे यू टर्न घेत होती. त्यावेळी महाडेश्वर यांनी कार अडवली. त्यावर कारमधील व्यक्तीने ‘मै यू टर्न यहा से ही लुंगा. कुछ भी करले. मै रजनीश सेठ साहब को बोलके तेरी वर्दी उतरवा दूंगा. तेरे को देख लुंगा,’ असे धमकाविले. त्यावर महाडेश्वर यांनी मोबाइलमध्ये त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू केले. मात्र, तरीही तो हुज्जत घालत होता. त्यानंतर त्याने महाडेश्वर यांच्या उजव्या पायाच्या पंजावर कार घातली. त्यामुळे ते जखमी झाले. हे पाहून त्यांचे अन्य सहकारी तेथे धावून आले. 

मोबाइलही खेचण्याचा प्रयत्न कार चालकाने तिथून निघताना महाडेश्वर यांचा व्हिडीओ रेकॉर्डिंग केलेला मोबाइल खेचण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना शिवीगाळ करून पळ काढला. याप्रकरणी महाडेश्वर यांच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलिसांनी बीएनएस कायद्याचे कलम १२१(१), १३२, ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :वाहतूक कोंडीवाहतूक पोलीसपोलिस