शिंदेसेनेच्या संभाव्य जागा वगळून उमेदवार निश्चिती सुरू, मुंबईतील ७० टक्के उमेदवार ठरलेपण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 09:07 IST2025-12-26T09:07:27+5:302025-12-26T09:07:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिवसभर पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठका घेत मुंबईतील ...

शिंदेसेनेच्या संभाव्य जागा वगळून उमेदवार निश्चिती सुरू, मुंबईतील ७० टक्के उमेदवार ठरलेपण...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिवसभर पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठका घेत मुंबईतील ७० टक्के, तर पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठीच्या जवळपास १०० टक्के उमेदवारांची नावे पक्की केली, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. मुंबईतील दोन जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि मालेगाव महापालिकेतील उमेदवारांची नावे शुक्रवारी निश्चित केली जातील.
भाजपच्या संघटनात्मकदृष्ट्या चार जिल्ह्यांमधील संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याशी चर्चा केली. जवळपास सर्व नावांवर शिक्कामोर्तब झाले. शिंदेसेनेला सोडण्यात येणाऱ्या संभाव्य जागा वगळून उमेदवार ठरविले गेले, असे समजते. शिंदेसेनेसोबत ज्या जागांवरून तिढा सुटलेला नाही अशांमध्ये ज्या जागा भाजप कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही त्यावरील उमेदवार निश्चित करणे सुरू झाले आहे.
रात्री उशिरापर्यंत खलबते
भाजपचे मुंबईतील ७० टक्के, तर पुणे पिंपरी-चिंचवडमधील बहुतेक उमेदवार ठरले असून, वर्षावर रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांची खलबते सुरू होती. आज उर्वरित मुंबई अन् उत्तर महाराष्ट्राचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
निर्णय ४८ तासांत
शिंदेसेनेशी जागा वाटपाचे सूत्र अंतिम झालेले नाही. भाजप शिंदेसेनेला ७५ ते ८० जागा देण्यास तयार आहे. शिंदेसेनेने किमान ९० ते कमाल १०० जागा मिळाल्याच पाहिजेत असा आग्रह धरला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आणखी चर्चा होणार आहे.
शिंदेसेनेशी युतीचा निर्णय ४८ तासांत करा, असे आदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिले आहेत. त्यानुसार जागा वाटपाची चर्चा मुंबईसह अन्य महापालिकांत युद्धपातळीवर सुरू आहे.
राष्ट्रवादी अन् रिपाइंचे काय?
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइंला भाजपच्या कोट्यातून जागा दिल्या जातील. आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षाला शिंदेसेनेच्या कोट्यातून जागा देण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीशी (अजित पवार) कोणतीही चर्चा भाजप करणार नाही, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.