एक कोटी लसीसाठी मागविलेल्या जागतिक निविदा रद्द; स्पुतनिकच्या वितरकांकडून लस मिळविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 19:57 IST2021-06-04T19:56:33+5:302021-06-04T19:57:00+5:30
जून अखेरीपर्यंत मिळणार साठा, प्रशासनाचा दावा

एक कोटी लसीसाठी मागविलेल्या जागतिक निविदा रद्द; स्पुतनिकच्या वितरकांकडून लस मिळविण्याचा प्रयत्न
मुंबई - कोविड प्रतिबंधक लसीसाठी महापालिकेने मागविलेल्या जागतिक स्वारस्य अभिव्यक्तीमध्ये सहभागी सर्व नऊ पुरवठादार अपुऱ्या कागदपत्रांअभावी अपात्र ठरले आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावरील कंपन्यांकडून लस मिळविण्याचे पालिकेचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी आता थेट स्पुतनिक या रशियन लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याकडून प्रायोगिक तत्त्वावर काही लसींचा साठा जून अखेरीपर्यंत मिळवण्याचे पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
एक कोटी लस खरेदीसाठी महापालिकेने १२ मे रोजी जागतिक स्वारस्य अभिव्यक्ती प्रकाशित केली. यामध्ये प्रतिसाद देणाऱ्या नऊ पुरवठादारांना आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. याबाबत संबंधित पुरवठादारांबरोबर प्रशासनाने ऑनलाइन चर्चाही केली. मात्र १ जूनपर्यंत एकाही पुरवठादाराने आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे दोन दिवस सर्व कागदपत्रांची छाननी केल्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
यासाठी कागदपत्रांची गरज...
लस पुरवठा करणारे पुरवठादार आणि प्रत्यक्ष लस उत्पादीत करीत असलेल्या कंपन्या यांच्यामध्ये असलेले व्यावसायिक संबंध, दिलेल्या मुदतीत आणि सुरळीपणे लस पुरवठा होईल याची शाश्वती, किती दिवसांत आणि किती प्रमाणात लस पुरवला जाईल, लसीचे दर व रक्कम याची छाननी करण्यात आली.
स्पुतनिक लसीसाठी प्रयत्न ...
जागतिक लस मिळविण्याचा प्रयत्न फेल गेल्यानंतर अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी शुक्रवारी स्पुतनिक या रशियन लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात स्पुतनिक लसींचा जून २०२१ पर्यंत पुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे.
शीतगृहातील साठवणुकीची चाचपणी...
स्पुतनिक लसीच्या शीतगृहातील साठवणुकीचे निकष वेगळे आहेत. त्यामुळे हा साठा मिळाल्यानंतर त्याच्या शीतगृहातील साठवणुकीची चाचपणी करण्यात येणार आहे. तसेच जुलै व ऑगस्ट २०२१ या दोन महिन्यांमध्ये स्पुतनिक लसीचा साठा मोठ्या प्रमाणात देण्याबाबत डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याकडे पालिकेने विचारणा केली आहे. त्यानुसार येत्या आठ ते दहा दिवसांत पुन्हा डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.