Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जामंत्र्यांनी केल्या नेमणुका रद्द; काँग्रेसमध्येच अंतर्गत विसंवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 01:05 IST

सारथी विभागावरून वादंग

- अतुल कुलकर्णी मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेसमध्ये कोणाशीही चर्चा न करता ऊर्जा विभागात १६ अशासकीय सदस्यांची नेमणूक केली. मात्र त्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर या नेमणुका रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत विसंवाद चव्हाट्यावर आला आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सारथी विभाग काँग्रेसकडेच असला पाहिजे, अशी मागणी करत ऊर्जा विभागातील नेमणुकांचा विषय मागे टाकण्याचा प्रयत्न केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी हा विभाग स्वत:कडे घेतल्याचे जाहीर करून दहा दिवस झाले. एवढ्या कालावधीत काँग्रेसकडून कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. आज अचानक सारथी हा विभाग काँग्रेसकडे राहिला पाहिजे, असे पत्र थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. यामुळे काँग्रेसमध्ये विसंवाद आणि महाविकास आघाडीत कोणी कोणाशी चर्चा करत नसल्याचे चित्र ठळकपणे समोर आले आहे.

महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांमध्ये निर्णय घेताना एकवाक्यता नाही. सरकार स्थापन करतेवेळी होणाऱ्या प्रत्येक नेमणुका आपापसात चर्चा करून केल्या जातील, असे ठरलेले असताना कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादी, तर कधी काँग्रेसकडून परस्पर निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे आघाडीत बिघाडी असल्याचा संदेश राज्यभर जात आहे. त्यातही निर्णय घेण्यात राष्ट्रवादी आघाडीवर आहे. त्यामुळे अनेकदा शिवसेना आणि काँग्रेसची त्यांच्यासोबत फरपट होत असल्याचे चित्र आहे. काँग्रेसकडून तत्काळ प्रतिक्रिया येत नाहीत किंवा वातावरण आणि परिस्थिती पाहून प्रतिक्रिया दिल्या जातात. हेच पुन्हा एकदा सारथीच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऊर्जामंत्री राऊत यांनी सोळा सदस्यांची नेमणूक केली, याची माहिती त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना दिलेली नव्हती. त्याशिवाय बांधकाममंत्री अशोक चव्हाण, पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हेदेखील याविषयी अनभिज्ञ होते. यावरून अंतर्गत नाराजी तीव्रपणे समोर आली, तेव्हा बुधवारी नितीन राऊत यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली.

आपण या नेमणुका रद्द करत आहोत, असे त्यांना सांगितले. त्यानंतरदेखील थोरात यांनी नाराज मंत्र्यांची बैठक घेतली, अशा बातम्या बाहेर आल्या. या बातम्या जाणीवपूर्वक दिल्या गेल्याचे थोरात यांच्या गोटातून सांगण्यात येत आहे. बुधवारी आपण फक्त राऊत यांना भेटलो अन्य कोणत्याही मंत्र्यांशी आपली चर्चा झाली नाही, असे थोरात यांनी सांगितले आहे. सारथी हा विभाग काँग्रेसकडे खातेवाटपात आला होता, तो विभाग काँग्रेसकडेच राहावा, अशी आपली मागणी आहे. आमच्यात कोणतीही नाराजी नाही, असेही थोरात यांनी या वेळी सांगितले.

‘निवडणुकांना तिघे एकत्र सामोरे जाऊ’

शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघे मिळून येणाºया काळातील सगळ्या निवडणुका एकत्र लढवणार आहेत, अशी एक बातमी राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ खासदाराने पत्रकारांना दिल्याची माहिती आहे. मात्र अशी कोणतीच चर्चा आमच्यात झालेली नाही. दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा विषयच नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे आम्ही तिघे एकत्र निवडणुकांना सामोरे जाऊ. दोन पक्षांनी एकत्र राहायचे अशी कुठलीही चर्चा पक्षात झालेली नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

टॅग्स :नितीन राऊतमहाराष्ट्र सरकार