कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 11:30 IST2025-08-26T11:30:44+5:302025-08-26T11:30:56+5:30
Canara Bank News: आधीच विकलेल्या आणि आधीच काही तारण ठेवलेल्या मालमत्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे कॅनेरा बँकेत तारण ठेवत त्याद्वारे ११७ कोटी रुपयांचे कर्ज घेत बँकेची फसवणूक करणाऱ्या अमित अशोक थेपाडे याला अखेर ईडीने रविवारी मुंबईत अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून तो ईडीच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देत होता.

कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
मुंबई - आधीच विकलेल्या आणि आधीच काही तारण ठेवलेल्या मालमत्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे कॅनेरा बँकेत तारण ठेवत त्याद्वारे ११७ कोटी रुपयांचे कर्ज घेत बँकेची फसवणूक करणाऱ्या अमित अशोक थेपाडे याला अखेर ईडीने रविवारी मुंबईत अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून तो ईडीच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देत होता.
दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून तो या हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. त्याच्या अटकेदरम्यान अधिकाऱ्यांनी त्याच्या रूममधून ५० पेक्षा जास्त बँक खात्यातील साडेनऊ लाखांची कागदपत्रे, सोने, २ कोटी ३३ लाख रुपयांचे हिरे, दोन वाहने, डिजिटल उपकरणे आदी मुद्देमाल जप्त केला. ईडीच्या विशेष न्यायालयाने त्याला पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली.
काय आहे प्रकरण?
गॅलक्सी कन्स्ट्रक्शन आणि मिस्टॉम एन्टरप्रायजेस या त्याच्या दोन कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या मालकीच्या काही अचल मालमत्ता होत्या. मात्र, यातील काही मालमत्तांची त्याने विक्री केली होती, तर काही मालमत्ता तारण ठेवल्या होत्या; परंतु कर्जाची उचल करण्यासाठी त्याने बनावट कागदपत्रांद्वारे कॅनरा बँकेकडे या मालमत्ता तारण ठेवल्या.