Join us  

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची होणार मराठवाड्यात बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 5:15 AM

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन तेथेच तात्काळ निर्णय व्हावेत याकरता ही बैठक मराठवाड्यात घ्यावी, अशी मागणी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

मुंबई : मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक मराठवाड्यात लवकरच होण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये ही बैठक होईल असे सूत्रांनी सांगितले.मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन तेथेच तात्काळ निर्णय व्हावेत याकरता ही बैठक मराठवाड्यात घ्यावी, अशी मागणी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना व्यक्तिश: विनंती करू, ते सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. दुष्काळी आढाव्याची बैठक मराठवाड्यात व्हावी, अशी सर्वांचीच भावना असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मुंडे यांनी मराठवाड्यातील भीषण दुष्काळ, तीव्र पाणीटंचाईकडे लक्ष वेधले. येथील सर्व धरणे, नद्या कोरड्याठाक आहेत. जनावरांसाठी पाणी व चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात घ्यावी, जेणेकरून याचा उपयोग या भागाला होईल, अशी मागणी त्यांनी केली. सिंचन अनुशेष आणि पाण्याची तूट भरून काढण्यासाठी अन्य धरणांतून पाणी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.चारा छावणी अनुदानात प्रतिपशुधन मोठ्या जनावरांना १२० व लहानांना ६० रुपये वाढ करावी, अशी मागणी मुंडे यांनी बुधवारीच पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

टॅग्स :दुष्काळमंत्रालय