Join us
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या आराखड्यास मंत्रिमंडळाची मान्यता, या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 22:25 IST

अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली होती.  

मुंबई  -  नैसर्गिक आपत्तीने यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कर्जमाफीची घोषणा केली होती. दरम्यान महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या आराखड्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.  या योजनेनुसार, १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एकापेक्षा जास्त कर्जखात्यात अल्पमुदत पीक कर्जाच्या पुनर्गठीत कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम २ लाखापेक्षा कमी असल्यास अशा सर्व खात्यास २ लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच जे शेतकरी अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करीत असतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे लवकरच नवीन योजना जाहीर करण्यात येणार आहे.

अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.  राज्यातील शेतकऱ्यांचे  ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे नाव या योजनेला देण्यात आले आहे. 

टॅग्स :शेतकरीमहाराष्ट्र सरकार