नवीन सवलतीत घ्या; अन्यथा जुन्या वाहनावर दुप्पट पर्यावरण कर भरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:28 IST2026-03-17T13:28:23+5:302026-03-17T13:28:32+5:30
नवीन वाहन खरेदीसाठी करामध्ये सवलत; वाढत्या वाहन प्रदूषणावर नियंत्रणासाठी सरकारचा निर्णय

नवीन सवलतीत घ्या; अन्यथा जुन्या वाहनावर दुप्पट पर्यावरण कर भरा
मुंबई : वाढत्या वाहनप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात जुनी वाहने स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना करामध्ये १६ ते ३० टक्क्यांपर्यंत सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
अधिक प्रदूषण करणाऱ्या जुन्या वाहनांवर आकारला जाणारा ‘पर्यावरण कर’ दुप्पट करण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या वाहनांचा वापर कमी करून पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाहनांचा वापर वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण गंभीर समस्या बनत असताना जुनी वाहने त्याला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जुनी वाहने स्क्रॅप करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कर सवलतीची योजना लागू करण्यात आली आहे.
वाहनधारकांनी अधिकृत स्क्रॅपिंग केंद्रात जुनी वाहने भंगारात दिल्यानंतर त्यांना स्क्रॅपिंग प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्राच्या आधारे नवीन वाहन खरेदी करताना नोंदणी करामध्ये सवलत
मिळू शकते.
बीएस-४ आणि त्याखालील मानकांतील वाहने अधिक प्रदूषण करीत असल्याने अशा वाहनांवर आकारला जाणारा पर्यावरण कर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या वाहनधारकांना मोठा करभार सोसावा लागणार आहे.
‘स्क्रॅपिंग’ने जुन्या वाहनांची संख्या कमी होण्यास मदत
आरटीओ अधिकाऱ्यांच्या मते, वाहन स्क्रॅपिंग धोरणामुळे जुन्या वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.
वाहनधारकांनी अधिकृत स्क्रॅपिंग केंद्रांचा वापर करून जुनी वाहने भंगारात द्यावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
१० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना ‘कर’ होणार लागू
विशेषतः १५ वर्षांपेक्षा जुनी खासगी वाहने आणि १० वर्षांपेक्षा जुनी व्यावसायिक वाहने यांच्यावर हा कर लागू होतो. वाहनाच्या फिटनेस किंवा नोंदणी नूतनीकरणाच्या वेळी हा कर भरावा लागतो.