मॉलमधील एका जाहिरातीने बुडवले लाखो रुपये; धोनीच्या मुलीसोबत काम करण्याची दिली होती ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:56 IST2025-06-25T13:55:54+5:302025-06-25T14:56:27+5:30
Mumbai Crime: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या मुलीच्या नावाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार मुंबईतून समोर आला ...

मॉलमधील एका जाहिरातीने बुडवले लाखो रुपये; धोनीच्या मुलीसोबत काम करण्याची दिली होती ऑफर
Mumbai Crime: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या मुलीच्या नावाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार मुंबईतून समोर आला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या मुलीसोबत कॅडबरी ओरियोच्या जाहिरातीसाठी निवड झाल्याचे सांगून एक दाम्पत्याची सव्वातीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अरिहंत शेट्टी नावाच्या व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक करणाऱ्याने या जाहिरातीसाठ एका फॅशन डिझायनरकडून कपडे घेण्यासाठी पैसेही घेतले होते. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने पोलिसांत धाव घेतली.
डिस्ने किड्स इंडियामध्ये काम करतो असा दावा करणाऱ्या अरिहंत शेट्टी याने ३१ वर्षीय व्यावसायिकाला ३.९१ लाख रुपयांना गंडा घातला. व्यावसायिकाचा मुलगा आणि त्याची भाची धोनीची मुलगी झिवा धोनीसोबत जाहिरातीत दिसण्यासाठी निवडली गेली आहे असं फसवणूक करणाऱ्याने सांगितले. मात्र वारंवार पैशांची मागणी केल्याने त्यांना संशय आला आणि हे प्रकरण उघडकीस आले.
आरोपीनेच घेतली ऑडिशन
आरोपी अरिहंत शेट्टी हा डिस्नी किड्स इंडिया या कंपनीचा संचालक म्हणून या व्यावसायिक दाम्पत्याशी संपर्कात होता. त्याने कंपनीची जाहिरात लोअर परळ येथील एका मॉलमध्ये लावली होती. मॉलमध्ये आलेल्या दाम्पत्याने ती पाहिली आणि त्याच्या संपर्क साधला. त्याने होम ऑडिशनच्या नावाखाली घरच्या घरीच तयार केलेले मुलांच्या अभिनयाचे व्हिडीओ तयार करण्यास सांगितले. तुमच्या मुलांचे व्हिडीओ आवडले असून त्यांची महेंद्रसिंह धोनीच्या मुलीसोबत कॅडबरी ओरियोच्या जाहिरातीसाठी निवड झाल्याचे आरोपीने सांगितले. त्यानंतर विविध कारणाने आरोपीने व्यावसायिकाला सव्वातीन लाख भरण्यास भाग पाडले. अरिहंत शेट्टी फॅशन डिझायनर रितू कुमारकडून त्याच्या मुलासाठी आणि भाचीसाठी कपडे खरेदी करण्यासह विविध बहाण्याने व्यावसायिकाकडे पैसे मागितले होते.
जाहिरातीला पडले बळी
तक्रारदार नीरव गिलितवाला हे भिवंडीमध्ये अल्ट्रा क्रिएशन्स नावाने कोटिंग युनिट चालवतात. नीरव, त्यांची पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलासह दादरमध्ये राहतात. ७ जून रोजी, गिलितवाला हे त्यांच्या पत्नी, मुलगा, बहीण आणि पाच वर्षांच्या भाचीसह लोअर परळ येथील प्ले सेंटरला गेले होते. त्यावेळी त्यांना डिस्ने किड्स इंडियाच्या जाहिरातींमध्ये कास्टिंगसाठी मुलांची गरज करणारी एक जाहिरात दिसली. गिलितवाला यांनी जाहिरातीत नमूद केलेल्या क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा समोरच्या व्यक्तीने सांगितले की तो डिस्ने किड्स इंडियामध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे आणि त्यांच्या मुलाला आणि भाचीला जाहिरातींमध्ये काम देऊ शकतो.
धोनीच्या मुलीसोबत काम करण्याचे दाखवलं आमिष
आरोपीने गिलितवाला यांना एक लिंक शेअर केली आणि त्यांना दोन्ही मुलांचे फोटो आणि एक मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने सांगितले की एजन्सीने निवडलेल्या २० मुलांमध्ये त्यांचा मुलगा आणि भाची देखील आहेत. आरोपीने गिलितवाला यांना नोंदणी शुल्क आणि जीएसटी म्हणून काही रक्कम भरण्यास सांगितली. पैसे भरल्यानंतर त्यांना एक मेसेज आला ज्यामध्ये तुमच्या दोन्ही मुलांची कॅडबरीच्या ओरिओ बिस्किटांच्या जाहिरातीसाठी निवड झाली आहे आणि ते झिवा धोनीसोबत काम करतील असं म्हटलं होतं.
त्यानंतर आरोपींनी मुलांचे आणखी व्हिडिओ मागवले आणि त्यांना सांगितले की शूटिंग सहा दिवस चालणार आहे. आरोपीने त्यांना एक कथित सामंजस्य करार देखील पाठवला होता ज्यावर त्यांना सही करून परत पाठवण्यास सांगितले. यानंतर आरोपीने गिलितवाला यांना शूटसाठी आवश्यक असलेले रितू कुमारने डिझाइन केलेल्या ब्रँडेड कपड्यांसाठी ३.२५ लाख देण्यास सांगितले. गिलितवाला यांनी पैसे दिल्यानंतर त्यांना आणखी पैसे देण्यास सांगितले. त्यांनी कुटुंबियांसोबत यावर चर्चा केली तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले.