स्वस्तात क्रिप्टोकरन्सीच्या प्रलोभनाने व्यावसायिकाला १९.७८ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:19 IST2026-03-12T13:18:24+5:302026-03-12T13:19:20+5:30
अंधेरी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

स्वस्तात क्रिप्टोकरन्सीच्या प्रलोभनाने व्यावसायिकाला १९.७८ लाखांचा गंडा
मुंबई : स्वस्तात क्रिप्टोकरन्सी देण्याचे प्रलोभन दाखवून एका शेअर व्यावसायिकाची १९ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संजय ऊर्फ मनोज जैन, रविकुमार, नीलेश कथपाल आणि अन्य एकासह चौघांविरुद्ध १० मार्चला अंधेरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार शेअर व्यावसायिक पंकज जगेशीया (वय ४२, रा. चेंबूर) हे काही महिन्यांपासून दुबईत नोकरी करत आहेत. वैयक्तिक गुंतवणुकीसाठी ‘यूएसडीटी’ ही क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याकरिता त्यांनी ५ जुलै २०२५ ला चेन्नईतील मित्र देवा कोंदापल्ली याच्याशी संपर्क साधला.
देवाने त्यांची ओळख प्रसादशी करून दिली. ९ जुलैला अंधेरीतील जे. बी. नगर परिसरात झालेल्या बैठकीला प्रसादसोबत संजय उपस्थित होता. त्याने दुबईमधून ‘यूएसडीटी’ पुरविण्याचा व्यवसाय करत असल्याचे जगेशीया यांना सांगितले.
मोठी खरेदी करण्याची होती अट
जगेशीया यांनी तीन लाख रुपयांची क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, आरोपींनी त्यांचा वरिष्ठ नीलेश कथपाल याच्याशी फोनवर संपर्क करून देत किमान २० लाखांची खरेदी करावी लागेल, अशी अट घातली.
बाजारभाव ९० रुपये असताना आरोपींनी ८५ रुपयांमध्ये क्रिप्टो देण्याचे आश्वासन दिले. दुसऱ्याच दिवशी नीलेशने पुन्हा फोन करून ८२ रुपयांनी क्रिप्टोकरन्सी देण्याची ऑफर दिली.
आंगडियामार्फत पैसे पाठवण्याची सक्ती
जगेशीया १२ जुलैला २० लाख रुपये रोख घेऊन अंधेरीतील तेली गल्ली येथे गेले. मात्र, हे पैसे आंगडिया सेवेमार्फत पाठविण्याची अट घातली. जगेशीया यांनी शंका उपस्थित करताच त्यांना मालाडच्या एका हॉटेलमध्ये नेऊन रविकुमारशी ओळख करून दिली. त्याने आपण दुबईहून क्रिप्टो पुरविणारा मुख्य ब्रोकर असल्याचे सांगितले.
वॉलेटमध्ये रक्कम जमा झालीच नाही
१४ जुलै रोजी जगेशीया यांनी आर. के. इंटरप्रायझेस आंगडियाच्या कार्यालयात १९ लाख ७८ हजार रुपये जमा केले.
मात्र, बराच वेळ उलटल्यानंतरही क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये रक्कम जमा झाली नाही. आरोपींनी विविध कारणे सांगून वेळ काढला. फोन घेणेही बंद केले. त्यामुळे जगेशीया यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.