व्यापाऱ्याचे ६६.८१ लाखांचे हिरे घेऊन केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 10:03 IST2025-10-15T10:03:01+5:302025-10-15T10:03:42+5:30
महेश नयानी यांनी अनेकदा उदय चौगले याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाइल बंद होता. हिरे परत न करता त्याने फसवणूक केली.

व्यापाऱ्याचे ६६.८१ लाखांचे हिरे घेऊन केली फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हिऱ्यांच्या खरेदीवर भरघोस नफा कमावून देणारी कंपनी असल्याचे भासवून वांद्र्यातील हिरे व्यापाऱ्याची ६६ लाख ८१ हजार ३१० रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी उदय चौगले या संशयिताविरुद्ध बीकेसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महेश नयानी (४३) हे वर्णी स्टार नावाची हिऱ्यांची कंपनी इतर दोन भागीदारांसोबत चालवतात. पुण्याचे उदय चौगले याच्याशी नयानी यांचा गेल्या आठ महिन्यांपासून व्यावसायिक संपर्क होता. या काळात चौगले याने वेळेवर पैसे दिले. १३ ऑगस्ट रोजी चौगले याने नयानी यांना, “माझ्याकडे एक चांगली ग्राहक कंपनी आहे, त्यांना व्हाईट राऊंड वर्णनाचे उच्च प्रतीचे हिरे हवेत,” असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून नयानी यांनी २३०.३९ कॅरेटचे, एकूण ६६ लाख ८१ हजार ३१० रुपयांच्या हिऱ्यांची झांगड पावती बनवून त्याच्याकडे दिले. पंधरा दिवसांनंतर नयानी यांनी चौगले याच्याकडे पैशांबाबत विचारणा केली असता, “सध्या गणेशोत्सव असल्याने थोडा वेळ लागेल,” असे उत्तर त्याच्याकडून देण्यात आले.
महेश नयानी यांनी अनेकदा उदय चौगले याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाइल बंद होता. हिरे परत न करता त्याने फसवणूक केली.