Mumbai: गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद; विद्यार्थिनींचे उपोषण, एमआयएमचा पाठिंबा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:34 IST2025-12-04T15:32:25+5:302025-12-04T15:34:34+5:30
Hijab Ban at Mumbai Goregaon College: मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील एका महाविद्यालयात ड्रेस कोडवरून नवा वाद उफाळून आला.

Mumbai: गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद; विद्यार्थिनींचे उपोषण, एमआयएमचा पाठिंबा!
मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील एका महाविद्यालयात ड्रेस कोडवरून नवा वाद उफाळून आला. महाविद्यालय प्रशासनाने परिसरात आणि वर्गामध्ये बुरखा घालण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थिनींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, महाविद्यालयाबाहेर उपोषण सुरू केले. महाविद्यालयाचा हा निर्णय त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्य आणि महिलांच्या हक्कांचे उल्लंघन करणारा आहे, असा त्यांनी म्हटले आहे.
महाविद्यालयात प्रवेश घेताना आम्हाला या ड्रेस कोडबद्दल कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. जर आम्हाला आधी माहिती असती, तर आम्ही या महाविद्यालयात प्रवेश घेतलाच नसता. बुरखा घालणे ही धार्मिक श्रद्धेची आणि वैयक्तिक आवडीची बाब आहे. महाविद्यालयातही बुरखा घालण्याची परवानगी मिळाली पाहिजे, अशा शब्दांत विद्यार्थिनींनी नाराजी व्यक्त केले. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात त्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर उपोषणाला सुरुवात केली.
विद्यार्थिनींच्या मागणीला एआयएमआयएम पाठिंबा
एआयएमआयएम पक्षाच्या मुंबई महिला शाखेच्या उपाध्यक्षा जहांआरा शेख यांनीही विद्यार्थिनींच्या मागणीला पाठिंबा दिला. त्यांच्या मते, मुलींना वर्गात बुरखा घालण्यापासून रोखणे चुकीचे आहे. हिजाबला परवानगी आहे, पण ज्या महिला विद्यार्थ्यांना पूर्ण चेहरा झाकल्याशिवाय अस्वस्थ वाटते, त्यांना बुरखा घालण्याची परवानगी दिली पाहिजे. हा पोशाख अभ्यासात किंवा महाविद्यालयीन शिस्तीत अडथळा येत नाही, तोपर्यंत महिला विद्यार्थ्यांना आपला धार्मिक पोशाख घालण्याचा अधिकार असला पाहिजे, असे ते म्हणाले.
महाविद्यालयाकडून स्पष्टीकरण
महाविद्यालय प्रशासनाने बंदी घालण्यामागे सुरक्षा आणि शिस्त ही प्राथमिक कारणे दिली. बुरखा पूर्ण चेहरा झाकतो, ज्यामुळे महिला विद्यार्थिनींची ओळख पटवणे कठीण होते. हा निर्णय धार्मिक भावनांच्या विरोधात नाही, केवळ कॅम्पस सुरक्षणासाठी आहे.