Join us  

‘या’ लोकांमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी; मंत्री अशोक चव्हाणांचा थेट आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 7:38 PM

अधिकाऱ्यांमुळे सरकारमध्ये मतभेद होत आहेत. याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. पुढील २-३ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत भेट होईल.

ठळक मुद्देभाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसने सरकारला साथ दिली आहेसरकार स्थापन करताना प्रत्येक पक्षाला समसमान संधी मिळेल असं सांगितलं होतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये काही नोकरशहा मतभेद निर्माण करण्याचं काम करतायेत

मुंबई – राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना महाविकास आघाडी सरकारमध्येही नाराजी असल्याचं समोर येत आहे. महाविकास आघाडीत मतभेद निर्माण करण्यासाठी नोकरशहांवर मंत्री अशोक चव्हाण यांनी आरोप केला आहे. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा मुद्दा समोर आणणार आहे असं त्यांनी सांगितले.

एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना अशोक चव्हाण म्हणाले की, अधिकाऱ्यांमुळे सरकारमध्ये मतभेद होत आहेत. याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. पुढील २-३ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत भेट होईल. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही सरकारमध्ये काही मुद्द्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे असं सांगत महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी करुन घ्यावं अशी आग्रही मागणी केली होती.

तसेच भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसने सरकारला साथ दिली आहे, याचा अर्थ काँग्रेस कमकुवत आहे असं नाही. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेस मंत्र्यांचे ऐकलं जात नाही. तिन्ही पक्षाचं मिळून हे सरकार बनलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निश्चित काँग्रेसचं जे म्हणणं आणि मुद्दे असतील ते ऐकून त्यावर तोडगा काढतील अशी अपेक्षा मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार राज्यसभा निवडणुकीवेळीही राज्यात राष्ट्रवादीने काँग्रेसशी चर्चा न करता दुसरा उमेदवार उतरवला होता. ज्यावेळी राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांच्या निवडणुकीवेळी प्रत्येक पक्षाचे २ उमेदवार जिंकणे सहज शक्य होतं, त्यावेळी मुख्यमंत्र्यांची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचा एक उमेदवार मागे घेण्यास भाग पाडलं. सत्तेत समान वाटा मिळेल असं सरकार स्थापन करण्यापूर्वी ठरलं होतं असंही ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले. आता राज्यपाल कोट्यातील १२ जागांमध्ये प्रत्येक पक्षाला समसमान जागा मिळायला हव्यात, पण आता राष्ट्रवादी-शिवसेना विधानसभेतील जागांनुसार वाटप करण्याचं योजत आहे हे चुकीचं आहे. त्यामुळे सरकारमध्ये काँग्रेसच्या अस्तित्वाला प्रश्नचिन्ह निर्माण होते असं ते म्हणाले.

दरम्यान, शनिवारी रामदास आठवले यांनी काँग्रेसने महाराष्ट्र सरकारला पाठिंबा देण्याबाबत पुन्हा विचार करावा असं म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन झालं आहे. जर महाविकास आघाडीत काँग्रेसला किंमत नसेल तर त्यांनी सत्ताधारी आघाडीत राहण्याचा विचार केला पाहिजे असं आठवले म्हणाले.

टॅग्स :काँग्रेसमहाराष्ट्र विकास आघाडीराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाअशोक चव्हाण