तुटलेले दात सापडले अन् ‘स्पायडर मॅन’ तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 09:27 IST2023-10-21T09:27:32+5:302023-10-21T09:27:40+5:30
एमएचबी कॉलनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोडने जून महिन्यात चोरी करून किचनच्या खिडकीतून पळून जाण्यासाठी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली.

तुटलेले दात सापडले अन् ‘स्पायडर मॅन’ तुरुंगात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गुन्हा घडल्याच्या ठिकाणी सापडलेल्या दोन तुटलेल्या दातांवरून ‘स्पायडर मॅन’ चोरापर्यंत पोहोचण्यात एमएचबी पोलिसांना यश आले आहे. अटक आरोपीचे नाव रोहित राठोड (२९) असे असून त्याच्यावर १९ हून अधिक गुन्हे नोंद आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
एमएचबी कॉलनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोडने जून महिन्यात चोरी करून किचनच्या खिडकीतून पळून जाण्यासाठी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. त्यात तो खाली पडला आणि त्याचे दोन दात तुटले, तसेच एक पायही फ्रॅक्चर झाला. त्याच्या मागावर असलेल्या एमएचबी कॉलनी पोलिसांनी चार महिन्यांनंतर त्याला पकडले.
अखेर गेल्या आठवड्यात आरोपी वाकोला येथील रुग्णालयात सापडला जिथे त्याच्यावर उपचार सुरू होते. पाळत ठेवत डिस्चार्ज झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. राठोडवर घरफोडीच्या गुन्ह्यांसह डीएन नगर, कांदिवली, बोरिवली, वाकोला, सांताक्रूझ, दहिसर, कस्तुरबा मार्ग आणि इतर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून वाकोला पोलिसांनी देखील त्याला ‘तडीपार’ केले होते.
राठोड हा पळताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला; मात्र अंधार असल्याने तो स्पष्ट दिसत नव्हता. परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त अजयकुमार बंसल आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. ज्यात एका पोलिस हवालदाराला त्याचा शोध घेण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात जाण्याची जबाबदारी देण्यात आली. तसेच घटनास्थळावरून सापडलेल्या दोन तुटलेल्या दातांनी पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यास मदत केली.