Join us
Daily Top 2Weekly Top 5

"एका गंभीर विषयाकडे आपले लक्ष वेधतोय"; राऊतांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 19:33 IST

आता, एका वेगळ्या विषयावरुन खासदार राऊत यांनी गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे. 

मुंबई - राज्यातील गुन्हेगारीच्या प्रश्नासंदर्भात शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेहमीच हल्लाबोल करण्यात येतो. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला होता. तर, शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत हेही फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करतात. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरुन त्यांनीही गृहमंत्र्यांना लक्ष्य केलं होतं. आता, एका वेगळ्या विषयावरुन खासदार राऊत यांनी गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे. 

एका गंभीर विषयाकडे आपले लक्ष वेधीत आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी डीएनए चाचणीच्या विषयावर भाष्य केले, त्यामागील व्यथात्मक कथाही सांगितली. 

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय ही महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाच्या अखत्यारीत असलेली संस्था न्यायदानाच्या प्रक्रियेत एक महत्त्वाची भूमिका बजावत असते. या प्रयोगशाळेतील DNA चा अहवाल हा विवादित पितृत्व चाचणी, खून, बलात्कार, POCSO कायदा इत्यादींमध्ये महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात ग्राह्य धरला जातो. परंतु एप्रिल २०२३ पासून DNA साठी लागणारे किट्स बहुतेक सर्व प्रयोगशाळेत उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्या विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे, अशी माझी माहिती आहे.

काही गंभीर तसेच संवेदनशील गुन्ह्यांतील हायप्रोफाईल आरोपींना अप्रत्यक्ष मदत व्हावी म्हणून हा तुटवडा निर्माण करणे व त्यातून पुरावे नष्ट करण्याची ही योजना असल्याचे बोलले जाते. ही अत्यंत गंभीर बाब आहे. परिणामी अनेक गुन्ह्यांच्या तपासामध्ये विलंब होत आहे. तपासामध्ये जप्त केलेला मुद्देमाल खराब होऊन त्यांचा गुन्हा सिध्दतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. या संचालनालयाला पूर्ण वेळ महासंचालक, न्यायिक व तांत्रिक तसेच संचालक असूनदेखील या गंभीर विषयाकडे लक्ष नसल्याचे दिसून येते. तरी कृपया या तक्रारीची दखल घेऊन यामध्ये दोषी असणारे अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार राऊत यांनी केली आहे.

दरम्यान, शिवसेना आणि भाजपात मतभेद झाल्यानंतर भाजपाने शिवसेनेत बंड घडवून आणलं. त्यानंतर, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे, शिवसेना ठाकरे गटाकडून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका केली जाते. तसेच, राज्यातील गृह खात्याच्या कारभारावरुनही त्यांच्यावर निशाणा साधला जातो. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीससंजय राऊतशिवसेनागुन्हेगारी