Join us

नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 06:40 IST

एकेकाळी ‘बैजू बावरा’ या प्रसिद्ध चित्रपटाचे चित्रीकरण दहिसर नदीच्या काठी झाले होते. आता त्याच नदीचे सांडपाण्याच्या पाण्यामुळे नाल्यात रूपांतर झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एकेकाळी ‘बैजू बावरा’ या प्रसिद्ध चित्रपटाचे चित्रीकरण दहिसर नदीच्या काठी झाले होते. आता त्याच नदीचे सांडपाण्याच्या पाण्यामुळे नाल्यात रूपांतर झाले आहे. मात्र, या नदीसह मिठी नदीला पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या आधारे गतवैभव प्राप्त करून देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली. पावसाळापूर्व कामांची तयारी म्हणून मुंबईत सुरू असलेल्या नालेसफाईचा पाहणी दौरा मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी केला. यावेळी त्यांनी महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांबाबत समाधान व्यक्त करीत नियोजित वेळेत सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना पालिका यंत्रणांना केल्या.

जे. के. केमिकल नाला (वडाळा), ए. टी. आय नाला (चुनाभट्टी), मिठी नदी (वांद्रे-कुर्ला संकुल), मजास नाला (जोगेश्वरी), दहिसर नदी (दहिसर पश्चिम) या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी नाल्यातील गाळ काढण्याच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला.  यंदा नाल्यातील गाळ काढण्यासाठी एकूण ५४,२२५ वाहनांचा वापर होत असून, या कामांचा दर्जा वाढवल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार कमी झाले आहेत, असे सांगून मागील वर्षाप्रमाणे यंदा देखील नाल्यातून गाळ उपसा कामामध्ये खडक लागेपर्यंत खोलीकरण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शिवाय पालिका क्षेत्रात नाला रुंदीकरण कामे अनेक ठिकाणी सुरू असून, अरुंद ठिकाणी पाणी तुंबून वसाहतींमध्ये पाणी शिरण्याचा धोका पाहता स्थानिकांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

या कामात अतिक्रमण ठरणाऱ्या बांधकामे हटवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी विरोध करू नये. अशा प्रकल्पात बाधितांना मोबदला किंवा पर्यायी निवासाची व्यवस्था करण्यात येईल, त्यांना पूर्ण न्याय दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘यंत्रणांनाच समन्वय महत्त्वाचा’

  • रेल्वेच्या परिसरात पावसाळापूर्व कामांचा आढावा आणि पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी केलेल्या उपाययोजना पाहण्यासाठी रेल्वेसोबत संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
  • यंदाच्या पावसाळ्यापूर्वीच्या तयारीत पालिका, रेल्वे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, म्हाडा यांनी संयुक्तपणे तयारी करणे आणि नियोजनाप्रमाणे प्रत्यक्षात समन्वय राखून कामकाज करणे महत्त्वाचे ठरणार आहे, असे शिंदे यांनी म्हटले.

सात एसटीपी प्रकल्पांची उभारणी

मुंबईच्या अनेक भागांत सांडपाणी आणि कचऱ्यामुळे नद्यांचे नाले झाले आहेत. त्यासाठी मुंबई मलनिस्सारण प्रकल्प (एसटीपी) हाती घेण्यात आला असून, या प्रकल्पांतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. मुंबईत अशा सात एसटीपी प्रकल्पांची उभारणी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबईनदी