धनगर समाज मुंबईत आणा, सहा कोटी मराठे पाठीशी उभे करतो; मनोज जरांगे पाटील यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 05:30 IST2026-03-25T05:30:10+5:302026-03-25T05:30:10+5:30
मराठा समाज धनगरांच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास व्यक्त करत, दोन्ही समाजांनी एकत्र येण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

धनगर समाज मुंबईत आणा, सहा कोटी मराठे पाठीशी उभे करतो; मनोज जरांगे पाटील यांचे आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. धनगर समाजाने घरी न थांबता मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी एक होऊन येत असाल तर राज्यातील ६ कोटी मराठा समाज तुमच्या पाठीशी उभे करतो, असा शब्द जरांगे यांनी दिला.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे व त्याची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांची जरांगे यांनी मंगळवारी भेट घेतली. जरांगे म्हणाले की, धनगर समाजाने संघटितपणे लढा दिला पाहिजे. सरकारकडे विनंती करा; पण समाजाने एकजूट दाखवली नाही तर न्याय मिळणे कठीण आहे. आरक्षण मिळवायचे असेल आणि ताकद दाखवायची असेल तर धनगर बांधवांनी घरी न थांबता मोठ्या संख्येने मुंबईत यावे, असे आवाहन त्यांनी केले.
मराठा समाज धनगरांच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास व्यक्त करत, दोन्ही समाजांनी एकत्र येण्याचे आवाहन जरांगे यांनी केले. मराठा, धनगर, मुस्लिम व दलित एकत्र आले तर सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील, त्यामुळे या समाजांनीही एकत्र येण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.