मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 09:43 IST2025-11-21T09:41:12+5:302025-11-21T09:43:57+5:30
Brihanmumbai Municipal Corporation election: काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र काँग्रेस स्वतंत्र लढल्यास मतविभाजन होऊन त्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो, अशी भीती ठाकरे गटाला वाटत आहे.

मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा
सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे केंद्र आणि राज्यातील सत्ता ताब्यात असलेल्या भाजपाने मुंबई महानगरपालिकेत आपला महापौर बसवण्यासाठी डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे मराठी माणसांचा मुद्दा हाती घेत उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षांनी युती करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्चित केले आहे. मात्र काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसकडून राज ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्यास आक्षेप घेतला जात आहे. दरम्यान, काँग्रेस स्वतंत्र लढल्यास मतविभाजन होऊन त्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो, अशी भीती ठाकरे गटाला वाटत असून, त्यामुळे काँग्रेसची मनधरणी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत स्वबळावर लढण्याची तयारी करत असलेल्या काँग्रेसची मनधरणी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये संभाव्य मतविभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलं पाहिजे आणि त्यामध्ये राज ठाकरे हेही सोबत असले पाहिजेत, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. तसेच आपली भूमिका काँग्रेससमोर मांडण्यासाठी ठाकरे गटाने चर्चा सुरू केली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून जागाटपाच्या चर्चेची जबाबदारी सांभाळत असलेल्या एका बड्या नेत्याने काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरेंची मनसे हे पक्ष एकत्र लढणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. मात्र मनसेची भूमिका ही आपल्या भूमिकेशी विसंगत असल्याचं मत काँग्रेसनं मांडलं आहे. तसेच राज ठाकरेंना सोबत घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी किमान आमच्याशी चर्चा करायला हवी होती, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. त्याबरोबरच मुंबईतील नेते आणि कार्यकर्त्यांचं मत विचारात घेऊन आपण स्वबळावर लढण्याचा निर्णय़ घेतला असल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं होतं.
त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मनसेसह एकत्रित मोट बांधण्यात उद्धव ठाकरे यांना यश येतं का हे पाहणं औत्सुक्याचं ठररणार आहे. तसेच त्यावर या निवडणुकीची पुढील समिकरणं अवलंबून असणार आहेत.