पुलांच्या सुरक्षेची अजूनही शाश्वती नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 06:01 AM2019-04-14T06:01:57+5:302019-04-14T06:02:06+5:30

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल पडल्यानंतर अभियंता, स्ट्रक्चरल आॅडिटरवर तत्काळ कारवाई झाली.

Bridge safety is not sustainable! | पुलांच्या सुरक्षेची अजूनही शाश्वती नाही!

पुलांच्या सुरक्षेची अजूनही शाश्वती नाही!

Next

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल पडल्यानंतर अभियंता, स्ट्रक्चरल आॅडिटरवर तत्काळ कारवाई झाली. अतिधोकादायक पूल तातडीने पाडण्यात आले, परंतु उर्वरित पुलांच्या फेरतपासणीचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे हे पूल सुरक्षित आहेत का? याची शाश्वती या दुर्घटनेच्या महिन्याभरानंतरही पालिकेला देता आलेली नाही. धक्कादायक म्हणजे, मुंबईतील पुलांच्या तपासणीसाठी जाहीर केलेले स्वतंत्र पूल तपासणी प्राधिकरणही स्थापन झालेले नाही.
महाड येथे २०१६ मध्ये सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर, मुंबईतील पुलांच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. ब्रिज मॅनेजमेंट सीस्टमद्वारे मुंबईत सर्व पुलांचे आयुर्मान, त्याचे स्थैर्य, डागडुजीचा रेकॉर्डचं ठेवण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिटही करण्यात आले, परंतु प्रत्यक्षात पुलांची डागडुजी काही सुरू झाली नाही. परिणामी, अंधेरी येथील गोखले पूल आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळण्याच्या दुर्घटना होत राहिल्या.
स्ट्रक्चरल आॅडिटरने किरकोळ दुरुस्ती सुचविलेला हिमालय पादचारी पूल कोसळल्याचे तीव्र पडसाद उमटले आणि पुन्हा मुंबईतील धोकादायक पुलांवर चर्चा सुरू झाली. सर्व पुलांच्या आॅडिटवरच प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने पूर्व, पश्चिम उपनगरातील पुलांची फेरतपासणी सुरूकरण्यात आली, तसेच शहरातील पुलांच्या फेरतपासणीसाठी नवीन ठेकेदार नेमण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष होऊ लागले आहे. दुर्घटनेला महिना होऊनही विशेष प्राधिकरण कागदावरच आहे.

>महिनाभरातील कारवाई
१४ मार्च रोजी सीएसटी स्थानकाला जोडणारा पादचारी पूल सायंकाळी ७.३० वाजता कोसळला. या दुर्घटनेत सहा पादचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर ३१ जण जखमी झाले. यापैकी एका जखमी महिलेचा दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
या दुर्घटनेसाठी जबाबदार ठरवत स्ट्रक्चरल आॅडिटर डी.डी.देसाईची शासकीय पॅनलवरून हाकलपट्टी करण्यात आली व काळ्या यादीत टाकून पोलिसांकडून अटक करण्यात आली. ठेकेदार आर.पी.एस इन्फ्रास्ट्रक्चरला कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. त्याचबरोबर, ए. पाटील आणि एस. काकुळते या अभियंत्यांना अटक करण्यात आली आहे.
>अहवाल पावसाळ्यानंतरच
पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पुलांचे पुन्हा आॅडिट करण्यात येत आहे. त्यानुसार, पश्चिम उपनगरात दीडशे पुलांपैकी ७४ पुलांचे आॅडिट झाले आहे, तर पूर्व उपनगरात ६४ पैकी १८ पुलांची फेरतपासणी करण्यात आली आहे. देसाई कंपनीमार्फत करण्यात आलेल्या शहर भागातील सुमारे ८० पुलांची फेरतपासणी करण्यासाठी नवीन स्ट्रक्चरल आॅडिटर नेमण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. या पुलांच्या फेरतपासणीचे अहवाल पावसाळ्यानंतरच हाती लागण्याची शक्यता पूल विभागातील सूत्रांनी व्यक्त केली.
अभियंता निवडणुकीच्या मोहिमेवर
पूल विभागात ४० टक्के पदे रिक्त आहेत, तसेच ५५ अभियंत्यांपैकी तब्बल ३५ अभियंता लोकसभा निवडणुकीच्या कामावर आहे. याचा फटका पूल विभागातील कामांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा प्रत्येक दुर्घटनांमध्ये अभियंत्यांवरच कारवाई होत असल्याने, अभियंत्यांच्या संघटनेने तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.
>घोषणा हवेत विरली
पूल दुर्घटनेनंतर पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मुंबईतील पुलांच्या तपासणीसाठी स्वतंत्र पूल तपासणी प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली. प्राधिकरणाच्या प्रमुखपदी पूल विभागाचे उपप्रमुख अभियंता एस. जी. ठोसर यांची नियुक्ती करण्यात आली. महिनाभरात आराखडा तयार करण्याचे आदेश पालिकेच्या संचालकांना (अभियांत्रिकी सेवा आणि प्रकल्प) देण्यात आले. मात्र, अद्याप या प्राधिकरणाची रचना झालेली नाही. त्यामुळे आयुक्तांची घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे.

Web Title: Bridge safety is not sustainable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.