Join us
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार केल्याप्रकरणी दोघांना २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 03:22 IST

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अलिबाग : घरी सोडतो असे सांगून आपल्या गाडीत घेऊन भर दिवसा गाडीतच विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने दोघा आरोपींना २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे अधिक सक्तमजुरी अशी शिक्षा माणगाव सत्र न्यायालयाचे सत्र न्या. टी. एम. जहागीरदार यांनी सुनावली आहे.

सुधागड तालुक्यातील पेडली गावाच्या हद्दीत ही घटना १५ मार्च २०१५ रोजी घडली होती. आरोपी गणेश देशमुख व राकेश बेलोसे यांनी संगनमत करून यातील पीडित फिर्यादी महिला १५ मार्च २०१५ रोजी दवाखान्यात औषधोपचाराकरिता पेडली या गावी गेली होती. दवाखान्यातून दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आपल्या वाघोशी या गावी घरी परत येत होती. त्या वेळी यातील आरोपी गणेश देशमुख व राकेश बेलोसे यांनी आपली गाडी थांबवून ही महिला एकटी आहे हे पाहून तिला आम्ही वाघोशी येथे जात आहे, असा बहाणा करून तिला आपल्या गाडीत बसवून घेतले. चालत्या गाडीतच दोघा आरोपींनी बलात्कार केला. त्यानंतर दमदाटी करून, धमकावून पीडित महिलेस घुरावले फाटा येथे रस्त्यातच सोडून दोघेही आरोपी फरार झाले होते.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास पालीचे तत्कालीन पो. नि. अशोक पवार यांनी करून दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी माणगाव सत्र न्यायालयाचे सत्र न्या. टी. एम. जहागीरदार यांच्या न्यायालयात झाली. सहा. जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.जितेंद्र डी. म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले. 

टॅग्स :गुन्हेगारीपुणे