Mumbai Crime: बिल्डरच्या घरात घुसले सीबीआयचे अधिकारी, नंतर कळले अख्खं पथक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 14:21 IST2025-06-22T14:20:19+5:302025-06-22T14:21:03+5:30

बोरीवलीत तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी विकासकाच्या घरात शिरून त्यांना धमकावल्याची घटना समोर आली आहे.

Borivali where impersonated CBI officers entered a developer house and threatened him | Mumbai Crime: बिल्डरच्या घरात घुसले सीबीआयचे अधिकारी, नंतर कळले अख्खं पथक...

Mumbai Crime: बिल्डरच्या घरात घुसले सीबीआयचे अधिकारी, नंतर कळले अख्खं पथक...

Mumbai Crime: तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी विकासकाच्या घरात शिरून त्यांना धमकावल्याची घटना बोरिवलीतील कस्तुरबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी समीर वर्तकसह चौघांवर गुन्हा नोंदवला.

अनिल गुप्ता (५१, रा. खुशल हेरिटेज, बोरिवली पूर्व) हे वसई-विरारमध्ये विकासक म्हणून काम करतात. २ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी त्यांच्या घरी आलेल्या दोघांनी दिल्लीतील सीबीआयमधून आल्याचे सांगत चौकशीसाठी बिल्डिंगच्या खाली चला, असे सांगितले. अनिल यांनी त्यांना नकार दिला. अनिल यांनी त्यांच्या घरी येण्याचे कारण विचारले असता वसईतील रहिवासी समीर वर्तक यांनी तुमच्याविरोधात तक्रार दिल्याचे सांगितले. अनिल यांनी तक्रारीची प्रत मागताच त्यांनी एक कागद दाखवला. त्यावेळी वर्तक यांना ओळखत नाही, असे त्यांनी स्पष्ट करताच एकाने फोनद्वारे समीरला घेऊन ये, असे सांगितले. त्यानंतर दोघे तिथे आले. त्यापैकी एकाने सीबीआयचा अधिकारी, तर दुसऱ्या व्यक्तीची ओळख समीर वर्तक करून दिली.

वसई-विरार महापालिका कार्यालयात समीरला पाहिले असून, तो तिथे माहिती अधिकार कार्यकर्ता अशी स्वतःची ओळख सांगत असल्याचे अनिल यांच्या लक्षात आले. वर्तकसोबत तुम्ही तडजोड करा, तसे न केल्यास तुम्हा अटक करू, अशी धमकी सीबीआय अधिकाऱ्याने त्यांना दिली. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्या व्यक्तींनी अनिल यांना धमकावत तुम्हाला जेलमध्ये खितपत पडावे लागेल, अशी धमकी दिली. त्यानंतर चौघेही तिथून निघून गेले. दरम्यान, त्यांचे चेहरे गुप्ता यांच्या घराबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाले.

अनिल यांनी याप्रकरणी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील सीबीआय कार्यालयात तक्रार केली. त्यामुळे त्यांनी ती तपासासाठी कस्तुरबा मार्ग पोलिसांकडे वर्ग केली. याप्रकरणी गुप्ता यांनी २० जूनला कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार देत सीसीटीव्ही फुटेजही दिले आहेत.

Web Title: Borivali where impersonated CBI officers entered a developer house and threatened him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.