पाणथळ जागा, स्थलांतरित पाणपक्ष्यांवर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची आंतरराष्ट्रीय परिषद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 04:08 PM2019-11-07T16:08:23+5:302019-11-07T16:15:27+5:30

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (BNHS) लोणावळा येथे १८ ते २२ नोव्हेंबर अखेर पाणथळ जागा व स्थलांतरित पक्षी या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे.

Bombay Natural History Society International Conference on Migratory Birds | पाणथळ जागा, स्थलांतरित पाणपक्ष्यांवर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची आंतरराष्ट्रीय परिषद

पाणथळ जागा, स्थलांतरित पाणपक्ष्यांवर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची आंतरराष्ट्रीय परिषद

Next

मुंबई - बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (BNHS) लोणावळा येथे १८ ते २२ नोव्हेंबर अखेर पाणथळ जागा व स्थलांतरित पक्षी या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. शास्त्रज्ञ, संशोधक, पक्षी अभ्यासक यांना या परिषदेमार्फत आशियातील उड्डाणमार्गासंदर्भात (फ्लायवे) उपयुक्त माहिती मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिषदेचा उद्देश आहे.

दरवर्षी स्थलांतर करणारे पक्षी लाखोंच्या संख्येने त्यांच्या उत्तरेकडील प्रजननाच्या ठिकाणाहून दक्षिणेकडे उष्णकटबंधीय देशांपर्यंत प्रवास करतात. बीएनएचएसच्या पक्षी स्थलांतराच्या सखोल अभ्यासातून समोर आले आहे की, हे पक्षी वर्षानुवर्षे पूर्वापार चालत आलेलेच स्थलांतराचे मार्ग (फ्लायवे) आणि स्थलांतराची ठिकाणे वापरतात. जगातील मुख्य नऊ उड्डाणमार्गांपैकी एक, मध्य आशियाई उड्डाणमार्ग (Central Asian Flyway) मधील भारत हा महत्त्वाचा देश आहे. भारतातील असलेले उष्ण हवामान यासोबतच जंगल, गवताळ भूभाग, सागरी आणि पाणथळ प्रदेश तसेच शेतजमीन असे वैविध्यपूर्ण आणि खाद्यानी समृद्ध असलेले अधिवास स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांसाठी आकर्षण असते. 

पक्षी स्थलांतर अभ्यासात अग्रणी असलेल्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने आत्तापर्यंत सात लाखांपेक्षा अधिक पक्ष्यांच्या पायात कडे घालून त्यांच्या स्थलांतराची सखोल माहिती उपलब्ध केली आहे. या अभ्यासाच्या आधारे केंद्र सरकारने मध्य आशियाई उड्डाणमार्गामधील स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या अधिवास संवर्धनाचा कृती आराखडा (India’s National Action Plan for Conservation of Migratory Birds and their Habitats along Central Asian Flyway) आहे. परंतु, अधिवासाचे संवर्धन आणि व्यवस्थापन यामध्ये वातावरणातील बदल, विकास प्रकल्प, लोकसंख्या विस्फोट यासारखी आव्हाने आहेत.

आशियाई उड्डाणमार्गातील पाणथळ व स्थलांतर करणारे पाणपक्षी (Wetland and Migratory Waterbirds of the Asian Flyways) या विषयावर ही पाच दिवसांची परिषद असणार आहे. या मध्ये अधिवासाचे संरक्षण आणि संवर्धन म्हणजे काय?, या संदर्भात सरकार आणि समाजासमोर कोणती आव्हाने आहेत?, सामान्य माणसाचा यांच्याशी काय संबंध आहे? अशा अनेक प्रश्नांवर या परिषदेत चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

Web Title: Bombay Natural History Society International Conference on Migratory Birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.