भाजप आमदाराला मुंबई हायकोर्टाचे समन्स; आमदारकी रद्द करण्यासाठी कोर्टात दोन याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:52 IST2025-02-11T13:52:09+5:302025-02-11T13:52:20+5:30

मुंबई उच्च न्यायालयाने भाजपचे उरणचे आमदार महेश बालदी यांना समन्स बजावले आहे.

Bombay High Court has summoned BJP MLA from Uran Mahesh Baldi | भाजप आमदाराला मुंबई हायकोर्टाचे समन्स; आमदारकी रद्द करण्यासाठी कोर्टात दोन याचिका

भाजप आमदाराला मुंबई हायकोर्टाचे समन्स; आमदारकी रद्द करण्यासाठी कोर्टात दोन याचिका

Bombay High Court: विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप आमदार महेश रतनलाल बालदी यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या दोन याचिकांवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. भाजप आमदार महेश रतनलाल बालदी आणि भारतीय निवडणूक आयोगाला मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावलं आहे. बालदी यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.  त्यानंतर गेल्या वर्षी त्यांनी उरण मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवत जिंकली होती.

याचिकाकर्ते सुधाकर शांताराम पाटील यांच्या वतीने वकील राजेश कचरे यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली. मतदार असल्याचे सांगत सुधाकर पाटील यांनी मालमत्ता जाहीर न केल्याच्या आधारावर बालदी यांच्या निवडणुकीला आव्हान दिलं आहे. मालमत्तेच्या चौकशीसाठी महेश बालदी यांना न्यायालयात खेचण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्ये याच मुद्द्यावरुन दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवर उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठात अद्याप सुनावणी सुरू आहे.

दुसरी याचिका प्रीतम म्हात्रे यांनी दाखल केली आहे. प्रीतम म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर बालदी यांच्याविरुद्ध गेल्या वर्षी निवडणूक लढवली होती. विधानसभा निवडणुकीत बालदी यांना ९५,३९०, तर म्हात्रे यांना ८८,८७८ मते मिळाली होती. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेनेही ही निवडणूक लढवली होती. मात्र त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला.

प्रीतम म्हात्रे यांच्या वकील प्रियंका ठाकूर म्हणाल्या की, बालदी यांच्या निवडणुकीला भ्रष्टाचारच्या आधारावर आव्हान देण्यात आले होते आणि त्यांचा विजय रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. दोन्ही याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी १० मार्चपर्यंत तहकूब केली आहे.

दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे महेश बालदी यांनी ९५१२१ मते मिळवत ६४७२ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शेकापचे प्रीतम म्हात्रे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत म्हात्रे यांनी बालदी यांना निकराची लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ८८६४९ मते मिळाली. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर गजानन भोईर ६९६२२ मते मिळवून तिसऱ्या स्थानावर होते.

Web Title: Bombay High Court has summoned BJP MLA from Uran Mahesh Baldi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.