नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:05 IST2025-06-25T16:03:20+5:302025-06-25T16:05:50+5:30

राहुल इंटरनॅशनल व नजिकच्या मदर मेरी स्कूलमध्ये ८०० किलो आरडीएक्स ठेवल्याचा ईमेल शाळेच्या अधिकृत मेलवर बुधवारी पहाटे आला होता.

Bomb threat mail to Mother Mary, Rahul International School in Nalasopara | नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल

नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल

नालासोपाऱ्याच्या श्री प्रस्था परिसरातील राहुल इंटरनॅशनल व मदर मेरी स्कूलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत शाळा महाविद्यालय खाली न केल्यास स्फोट होऊन जीवितहानी होईल अशा धमकीचा ई-मेल आल्याने या परिसरामध्ये खळबळ उडाली होती. परंतु, तपासाअंती ही अफवा असल्याचे सिद्ध झाले.

राहुल इंटरनॅशनल व नजिकच्या मदर मेरी स्कूलमध्ये ८०० किलो आरडीएक्स ठेवल्याचा ईमेल शाळेच्या अधिकृत मेलवर बुधवारी पहाटे ४ वाजून २६ मिनीटांनी आला होता. सकाळी शाळा भरली असताना सात वाजता शाळेच्या कर्मचाऱ्यांनी हा ईमेल वाचला. राम मंदिराच्या वादग्रस्त प्रकरणासाठी स्फोटके शाळेत ठेवले असून दुपारी दोन वाजण्याच्या आधी शाळा खाली न झाल्यास स्फोट होईल. अशी धमकी या ईमेल द्वारे देण्यात आली होती. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सकाळच्या  सुमारास घरी पाठवून शाळा रिकामी करण्यात आली. 

ही माहिती नालासोपारा पोलिसांना शाळेकडून देण्यात आली. यानंतर वसई-विरार मनपाचे अग्निशमन दलाचे जवान, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे यांच्यासह गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक, खंडणी विरोधी पथक, सायबर टीम तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथक शाळेमध्ये दाखल झाले. संपूर्ण शाळा तपासण्यात आली. परंतु, संशयास्पद कुठलीच वस्तू सापडली नाही. धमकी देणाऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत असून प्राथमिक माहिती मध्ये सदरचा ईमेल दक्षिण भारतातून आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याची माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी दिली.   

Web Title: Bomb threat mail to Mother Mary, Rahul International School in Nalasopara