बेपत्ता बालकाचा मृतदेह सापडला; बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 06:39 IST2024-12-22T06:39:00+5:302024-12-22T06:39:12+5:30

आतापर्यंत १०० जणांना वाचविण्यात यश आले आहे. 

Body of missing child in Nilkamal boat accident found on Saturday | बेपत्ता बालकाचा मृतदेह सापडला; बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर

बेपत्ता बालकाचा मृतदेह सापडला; बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर

मुंबई : नीलकमल बोट दुर्घटनेतील बेपत्ता बालकाचा मृतदेह शनिवारी दुपारी १.३० वाजता नौदलाने बाहेर काढला असून, मृतदेह जे जे रुग्णालयात पाठविला आहे. गोवा येथील रहिवासी मोहम्मद जोहान अशरफ पठाण वय ६ वर्ष याचा मृतदेह शोधकार्यादरम्यान सापडला. यानंतर दुर्घटनेतील मृतांची संख्या १५ झाली असून, आतापर्यंत १०० जणांना वाचविण्यात यश आले आहे. 

शनिवारी नीलकमल फेरीबोट अपघातातील शेवटच्या बेपत्ता बालकाचा मृतदेह सापडला असून, रविवारी दुपारीपर्यंत बोटीखाली संपूर्ण तपासणी केल्यानंतर हे शोधकार्य थांबविण्यात येणार असल्याचे नौदल सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. नौदलप्रमुख दिनेश त्रिपाठी यांच्याकडून शुक्रवारी आढावा भेट घेण्यात आली होती. त्यांनी शुक्रवारी उशिरा अश्विनी रुग्णालयात जाऊन अपघातात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेतली. या भेटीनंतर ते दिल्लीला परतले. अपघाताबाबत चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीकडून अहवाल आल्यानंतर दिल्लीतून याबाबत अधिक तपशील मिळू शकेल, अशी माहिती नौदलाचे जनसंपर्क अधिकारी मेहुल कर्णिक यांनी दिली.

रविवार दुपारपर्यंत शोधकार्य सुरू

शनिवारी नौदलाच्या ९ बोटींमधील ३६ कर्मचारी अधिकाऱ्यांनी राबविलेल्या शोधमोहिमेतून बेपत्ता बालकाचा गेट वे इंडियाजवळ शोध लागला. 

नीलकमल फेरी बोटीमध्ये आधी ८० लोक बोटीतून प्रवास करत होते असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ११० प्रवासी आणि कामगार प्रवास करत असल्याचे बचावकार्यादरम्यान समोर आले आहे.

अजूनही कोणी अडकले नाही याची खात्री करण्यासाठी रविवार दुपारपर्यंत नौदलाचे शोधकार्य सुरू राहणार आहे, अशी माहिती कर्णिक यांनी दिली.

Web Title: Body of missing child in Nilkamal boat accident found on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.