वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर दोन तरुणांचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 10:43 IST2023-08-04T10:42:44+5:302023-08-04T10:43:10+5:30
मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले आहेत.

वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर दोन तरुणांचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ
मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणांकडे सापडलेल्या आधारकार्डवरुन तरुणांची ओळख पटली आहे. दीपक बिश्त (वय २५) आणि हरदेव सिंग (वय २६) अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघेही तरुण मूळचे हरियाणातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणांचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती कळू शकलेली नाही.
याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. वर्सोवा पोलीस एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तरुणांचा अपघाती मृत्यू झाला की त्यांची हत्या झाली हे स्पष्ट होईल. पोलीस सध्या नातेवाईकांची चौकशी करत आहेत.
वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावरील लाईफ गार्डला हे मृतदेह आढळून आले. त्यानंतर त्यानं तातडीनं पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. दोन्ही मृतदेह १०० मीटरच्या अंतरावर पडले होते. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.