"त्यांचा काहीतरी व्हिडीओ हाताला..."; मुंबईत कमळ फुलणार म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर मनसेचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 14:00 IST2025-10-23T13:43:54+5:302025-10-23T14:00:11+5:30
MNS on Mahesh Kothare: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमात भाजप आणि पंतप्रधान ...

"त्यांचा काहीतरी व्हिडीओ हाताला..."; मुंबईत कमळ फुलणार म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर मनसेचा निशाणा
MNS on Mahesh Kothare: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुंबईत भाजपचे कमळ फुलेल, असा विश्वास व्यक्त केला. या विधानाची मुंबईच्या राजकारणात चर्चा सुरु झाली असून, यावर ठाकरे गटानंतर आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनीही कठोर शब्दांत टीका केली आहे.
मुंबईतील एका दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलताना महेश कोठारे यांनी स्वतःला 'पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त' घोषित केले. एवढेच नाही, तर त्यांनी "पुढच्या दिवाळीपर्यंत मुंबई महापालिकेवर भाजपचे कमळ फुललेले असेल," असा ठाम विश्वास व्यक्त केला. तसेच, आपल्या भागातून निवडून आलेला नगरसेवक मुंबईचा पुढचा महापौर व्हावा, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली होती. त्यामुळे कोठारे यांचे हे विधान भाजपच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला आणि महापौरपदाच्या दाव्याला बळ देणारे मानले जात आहे.
महेश कोठारे यांच्या या विधानावर खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका करत त्यांना प्रत्युत्तर दिले. आता मनसे नेते आणि ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही कोठारे यांच्या विधानावर निशाणा साधला आहे. जाधव यांनी थेट शब्दांत सांगितले की, महेश कोठारे यांचा बहुतेक भ्रमनिरास होईल. कोठारे यांनी व्यक्त केलेला विश्वास वास्तवात उतरणार नाही, असे सूचक मत मनसे नेत्याने व्यक्त केले आहे. मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप, ठाकरे गट आणि मनसे यांच्यासह सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असताना, कोठारे यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
"असं महेश कोठारे म्हणाले आहेत का. बहुतेक त्यांचा भ्रमनिरास होईल. कारण अशी काही मुंबईची परिस्थिती नाही. हे लाचार लोक आहेत. काहीतरी त्यांचा व्हिडीओ वगैरे त्यांच्या हाताला लागला असेल आणि म्हणून ते भक्त झाले असतील," अशी टीका अविनाश जाधव यांनी केले.
भाजपची महापौरपदासाठी रणनीती
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, यावेळी राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर भाजप आणि शिंदे गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. पण महायुतीतील शिंदे गटाला सोबत घेऊन जागावाटप आणि महापौरपदाचा उमेदवार निश्चित करणे हे भाजपसाठी मोठे आव्हान असणार आहे.