Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महापौर, उपमहापौरपदासाठी ठाकरे गटही उमेदवार देणार? मातोश्रीवर बैठक; हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:09 IST

BMC Mayor Election 2026: उद्धवसेनेने महापौरपदासाठी उमेदवार दिल्यास या निवडीतील चुरस वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.

BMC Mayor Election 2026: मुंबई मनपा निवडणुकीत महायुतीने बहुमताचा आकडा पार करत मोठा विजय मिळवला. ठाकरे बंधूंनी युती केली असली, तरी त्याचा मोठा प्रभाव मुंबईत दिसला नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. यानंतर आता महापौर आणि उपमहापौरपदासाठीभाजपा आणि शिवसेना शिंदे गटात चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. यातच आता उद्धवसेनेकडूनही महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. 

मुंबई महापालिका महापौरपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम ठरला आहे. ०७ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर ११ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचा महापौर घोषित करण्यात येणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महापौरपादासाठी अर्ज मागे घेण्याची वेळ सभागृह भरण्याच्या १५ मिनिटे आधी असेल, अशी माहिती मिळाली आहे. यानंतर आता हालचालींना वेग आला असून, उद्धवसेनेची मातोश्रीवर एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे बोलले जात आहे. 

उद्धवसेना महापौर, उपमहापौर पदाचा उमेदवार देण्याची शक्यता

भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाकडे पुरेसे संख्याबळ असले तरी उद्धवसेना महापौर, उपमहापौर पदाचा उमेदवार देण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. ७ फेब्रुवारीला उद्धवसेना महापौर, उपमहापौर पदाचा उमेदवाराचा अर्ज भरणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात गटनेता किशोरी पेडणेकर व इतर काही अनुभवी नगरसेवकांना बैठकीसाठी मातोश्रीवर बोलवले असल्याचे सांगितले जात आहे. संख्याबळ नसले तरी महापौर, उपमहापौरपदाचा अर्ज भरण्याचा उद्धवसेनेचा विचार सुरू असून, यामुळे या निवडीतील चुरस वाढू शकते, असेही म्हटले जात आहे. 

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. मुंबईच्या महापौर पदासाठीची ही निवडणूक आवाजी पद्धतीने हात उंचावून घेतली जाणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून पालिका आयुक्त भूषण गगराणी हे कामकाज सांभाळणार आहेत. निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ८९ तर शिंदेसेनेचे २९ असे मिळून ११८ नगरसेवक निवडून आल्याने महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ३ नगरसेवक शिंदेसेनेत सामील होणार आहेत. त्यामुळे शिंदेसेनेची सदस्य संख्या ३२ वर जाणार असून शिंदेसेनेची ताकद वाढणार आहे.  

 

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray Group to Field Candidates for Mumbai Mayor, Deputy Mayor?

Web Summary : Amidst BJP-Shinde Sena talks, Uddhav Sena may contest Mumbai Mayor elections. A crucial meeting at Matoshri is expected to decide their strategy. Election on Feb 11.
टॅग्स :महापौरमुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६नगर पालिकाभाजपाशिवसेनाउद्धव ठाकरे